घरमुंबईकडोंमपाचे नगरसेवक घाबरले, 'म्हणे पाटीसुद्धा झाकून ठेवावी लागते'!

कडोंमपाचे नगरसेवक घाबरले, ‘म्हणे पाटीसुद्धा झाकून ठेवावी लागते’!

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शहरामधल्या ट्रॅफिकचा मुद्दा मंगळवारी तापल्याचं पाहायला मिळालं.

कल्याण डोंबिवली शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे तीव्र पडसाद मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाकडेच बोट दाखवित नाराजी व्यक्त केली. महासभेत आवाज उठवूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे लोकांच्या टीकेला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. मग महासभेत येऊन काय उपयोग? असा सूर सर्वच नगरसेवकांनी लगावला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी ‘शहराचे भविष्य अंधकारमय आहे, ते तुमच्या हातात आहे, आमच्या हातात नाही’, अशी हतबलता व्यक्त केली. एकीकडे सत्ताधारीच स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवत असताना दुसरीकडे भाजप नगरसेवकांच्या हतबलतेविषयी पालिका वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.

‘लोकांच्या भितीने पाटी झाकून ठेवावी लागते’

गेल्या आठ महिन्यांपासून कासवगतीने सुरू असलेले पत्रीपुलाचे काम आणि डोंबिवलीतील कोपर पूल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी तहकुबी सूचना मांडली होती. यावर बोलताना दामले म्हणाले की, पत्रीपूलावरून जाताना गाडीवर असलेली नगरसेवकाची पाटी झाकून ठेवावी लागते. कारण रस्त्यावरील नागरिक आमच्याकडे रागाने बघतात. कोपर ब्रीज बंद केल्यानंतर वाहतूक कोंडीच्या त्रासात आणखीनच भर पडणार आहे. महासभेत अनेक वेळा सांगूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे महासभेला येण्याची इच्छा नाही, अशीही नाराजी दामले यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याणच्या मलंगगड रोडवर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

२१ ऑगस्टला कोपर पुलासंदर्भात बैठक

नगरसेवक म्हात्रे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत पालिका आयुक्तांनी याबाबत नियंत्रण ठेवले पाहिजे, अन्यथा तुम्हाला बसवायचे कि नाही याचही विचार करावा लागेल, असा इशाराच पालिका आयुक्तांना दिला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली. त्यानंतर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी वाहतुकीच्या दृष्टीकोनातून दोन्ही ब्रीज निश्चितच महत्वाचे आहेत पण पालिका प्रशासनाने काही केलं नाही हा आरोप चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं. कोपर ब्रीजसंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेच्या डीआरएमकडे बैठक लावली. मात्र रेल्वेकडून सहकार्य मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. कोपर पुलाच्या संदर्भात बुधवार २१ ऑगस्ट रोजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी रेल्वेचे डीआरएम यांच्यासोबत बैठक बोलवली आहे, अशीही माहिती बोडके यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -