ठाण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम

ठाणेकरांना दहा दिवसांपासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करीत आहेत. त्यामुळे ठाण्यातील अजूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.

Thane
traffic issues in thane due to metro work

अवघा घोडबंदर रोड मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा शिकार झाला आहे. त्यामुळे ठाण्याचा महत्त्वाचा आणि वाहतुकीचा केंद्र बिंदू असलेल्या तीन हात नाका उड्डाणपुलाशेजारीच मधोमध काम सुरू केल्याने दहा दिवसांपासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करीत आहेत. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचा प्रयत्नही वाहतूक शाखेने केला. मात्र दहा दिवसानंतर वाहतूक शाखा जागी झाली. ५ नोव्हेंबर रोजीच्या अधिसूचनेवर ६ नोव्हेंबर पासून वाहतूक बदल अंमलात आणले. मात्र या सूचनेचे पत्र गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आले. तेव्हा वाहतूक शाखेच्या या अकार्यक्षम तत्परतेची खिल्ली वाहन चालकांकडून उडवली जात असून वाहतूक बदलामुळे शहरातील कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

अनेक महिने महामार्ग चिंचोळा बनल्याने कोंडीचा त्रास

ठाणे शहरातून मार्गस्थ होणारा मेट्रो-४ या प्रकल्पाचे काम गेले वर्षभर सुरु आहे. यासाठी ठाण्यातील पूर्वद्रुतगती महामार्ग, एलबीएस रोड आणि घोडबंदर रोडवर बॅरिकेड्स टाकून फुटपाथ शेजारील अर्धा अधिक रस्ता अडवण्यात आला आहे. यामुळे गेले अनेक महिने महामार्ग चिंचोळा बनल्याने कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावरून बोरिवली, मिरारोड, नालासोपारा, वसई-विरार आदींसह गुजरात आणि अन्य राज्यात जाणाऱ्या बसेस व जड-अवजड वाहनांची रेलचेल असते. या रस्त्यावरील तीन हात नाक्यावर देखील बस थांब्यानजीक बॅरिकेड्स लावून मेट्रोचे काम सुरु होते.

वाहने वागळे इस्टेट भागात अडकून पडण्याची चिन्हे

मात्र गेल्या काही दिवसांपासून तीन हात नाका उड्डाणपुल शेजारील रस्त्यावर थेट मधोमध मेट्रोचे खोदकाम सुरू केले असून यासाठी बॅरिकेड्स लावून निम्याहून अधिक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहतूक खोळंबून राहत असून सायंकाळी वर्दळीच्या वेळेत तर पुरता खेळखंडोबा होतो. यातच सकाळ-संध्याकाळ वाहतूक हवालदारांची महत्वपूर्ण तपासणी याच ठिकाणी होत असल्याने कोंडीत भरच पडत असते. त्यातच आता वाहतूक शाखेने वाहतूक बदलाचा उपाय केल्याने ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर परिणाम होऊन अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वाधिक वाहने वागळे इस्टेट भागात अडकून पडण्याची चिन्हे आहेत.

वाहतूक बदल

ठाणे आणि मुंबईतून येजा करणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर नेहमीच वर्दळ असते. याच तीन हात नाका उड्डाणपुला नजीक मेट्रो मार्गाचे खांब उभारण्यात येत असल्याने या मार्गावर वाहतूक बदल करण्याचा उपाय वाहतूक शाखेने अवलंबला आहे. त्यानुसार बुधवारपासून (ता ६ नोव्हेंबर) हे बदल लागू करण्यात आले. येथील काम पुर्ण होईपर्यंत वाहतूक बदल कायम राहणार असल्याची माहिती गुरुवारी (ता. ७) प्रसिद्धीपत्रक काढून वाहतूक शाखेने दिली. नितीन कंपनी जंक्शन येथून आरटीओ सर्व्हिस रोडवरून तीन हात नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना तीन हात नाक्याच्या दिशेने येण्यास बंदी केली. ही वाहने एलआयसी सर्कल येथून उजवीकडे वळून हाजुरी दर्गामार्गे वागळे व इच्छित स्थळी जातील. तर एस.जी. बर्वे मार्गावरून तीन हात नाक्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने संकल्प चौक येथे मोहन कोपेकर मार्ग, रहेजा चौक मार्गे जाण्यास अनुमती देण्यात आली आहे.


हेही वाचा – ठाणे जिल्ह्यातील ‘बाल लिंग’ गुणोत्तरात वाढ!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here