घरमुंबईवाहतूक पोलीस विभागाचे ‘एक राज्य एक ई-चलान’

वाहतूक पोलीस विभागाचे ‘एक राज्य एक ई-चलान’

Subscribe

प्रायोगिक तत्वावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, नागपूरमधून सुरूवात

मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालक आणि मालकांना ई-चलानाद्वारे आकारण्यात आलेल्या सुमारे दीडशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी असताना आता संपूर्ण राज्यात ‘ई चलान’ उपक्रम राबवण्यात येत असल्याची घोषणा राज्य वाहतूक पोलिसांनी केली आहे.

‘एक राज्य एक ई-चलान’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राज्य वाहतूक पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आला असून त्याची सुरुवात राज्याच्या प्रमुख शहरांपासून करण्यात येत आहे. मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना ई-चलान मार्फत करण्यात आलेल्या दंडाच्या थकबाकीचा आकडा फुगतच चालला असून जुलै २०१८ पर्यंत दंडाची थकबाकी ११८ कोटी १८ लाख १९ हजार ८०० रुपये एवढी होती. पाच महिन्यात हा आकडा वाढून डिसेंबर २०१९ पर्यंतची थकबाकीचा आकडा १५३ कोटी ४४ लाख ६२ हजार रुपये एवढा झाला असल्याची धक्कादायक माहिती महिती अधिकारातून समोर आली आहे.

- Advertisement -

या थकबाकीची रक्कम सरकारी तिजोरीत कशी जमा होईल यावर अद्याप कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नसताना या ‘ई-चलान’चे जाळे संपूर्ण राज्यभर पसरवण्याची घोषणा राज्य वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. राज्य वाहतूक पोलीस विभागाकडून ‘एक राज्य एक ई-चलान’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा मुंबई, नागपूर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, चिंचवड या शहरातून सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच विस्तारित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. ई-चलानद्वारे करण्यात येणार्‍या दंडांची रक्कम भरण्यासाठी नागरिकांसाठी https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळावर दंडाची माहिती आणि दंडाची रक्कम भरण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. तसेच ‘MAHATRAFFICAPP’आणि ‘MUMTRAFFICAPP’ हे दोन मोबाईल अ‍ॅप्सदेखील सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबईत या उपक्रमाला ऑक्टोबर २०१८ मध्ये एक वर्ष पूर्ण झालेले आहे. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणार्‍या वाहन चालकांना दंड आकारण्यासाठी २०१७ सालापासून मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला जात आहे.

मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून महत्त्वाच्या ठिकाणी तसेच सिग्नल जवळ अत्याधुनिक स्पीड कॅमेरे बसवण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडून सुसाट जाणार्‍या वाहने या कॅमेर्‍यात कैद वाहनांचा क्रमांकावरून परिवहन विभागात नोंद असलेल्या मालकाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर किंवा घरच्या पत्त्यावर ई-चलन पाठवण्यात येते. यासाठी वाहतूक विभाग टपाल खात्याची मदत घेत आहे. रस्त्यावर उभे असलेले वाहतूक पोलीस ई-चलनामुळे वाहन चालकासोबत वाद न घालता थेट ई-चलनाचा आधार घेऊन त्या वाहन चालकावर कारवाई करीत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी झाली, मात्र थकबाकी वसूल कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. ई-चलनाद्वारे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतूक विभागाने अनेक पर्याय दिलेले आहेत. मात्र ई-चलनाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पैसे वेळेत भरणार्‍यांचे प्रमाण खूप कमी आहे.

मुंबईत जानेवारी २०१८ ते डिसेंबर२०१८ पर्यंत ६१ लाख ६५ हजार २९९ ई-चलानद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत २२८ कोटी १८लाख ८२ हजार २८६ एवढा दंड आकारण्यात आला आहे. त्यातून ७४ कोटी ७४ लाख १९ हजार ५५१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मुंबईत ही परिस्थिती आहे, तर संपूर्ण राज्यभरात ई-चलान हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात दंडाच्या थकबाकीचा आकडा हजारो कोटींच्या घरात जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -