घरमुंबईठाण्यातील पदपथावरच पालिकेचे अतिक्रमण; खोदकामामुळे वाहतूक कोंडी

ठाण्यातील पदपथावरच पालिकेचे अतिक्रमण; खोदकामामुळे वाहतूक कोंडी

Subscribe

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच पदपथावर अतिक्रमण केल्याचा प्रकार ठाणे येथे घडल्याचे समोर आले आहे.

रस्ते आणि पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे ठेवा, असे आवाहन एकिकडे महापालिकेकडून ठाणेकरांना केले जात असतानाच, दुसरीकडे मात्र, पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच पदपथावर अतिक्रमण केल्याचा प्रकार घडला आहे. ठाण्यातील गजानन महाराज चौक परिसरात खोदकाम सुरू आहे. मात्र, त्याचे सर्व साहित्य पालिकेने पदपथावरच टाकले आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू असल्याने, नागरिकांना त्या पदपथावरून चालणेही मुश्किल झाले आहे. तसेच खोदकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांसह विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

वर्षभरापासून खोदकाम सुरू

गजानन महाराज चौक हा रहदारीचा आणि अपघाती रस्ता म्हणूनच ओळखला जातो. या परिसरातील धोकादायक वळणावर गेल्या वर्षभरापासून खोदकाम सुरू आहे. या परिसरातील दोन्ही बाजूच्या पदपथावर वर्षभरापासून पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यासाठी लागणारे मोठे पाईप, सिमेंट आदी साहित्य ठेवले आहे. पालिकेच्या अतिक्रमणामुळे पदपदाथावरून चालण्याचा मार्ग बंद झाला आहे. खोदकामामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत असल्याने, त्यातच पदपथाचा मार्ग बंद असल्याने पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करीतच ये -जा करावी लागत आहे. तसेच या कामाविषयी माहिती देणारा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या परिसरात महाराष्ट्र विद्यालय, ब्राह्मण विद्यालय, सेंट जॉन बापटीस स्कूल, दगडी शाळा, शिवसमर्थ विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल या सहा शाळा आहेत. शाळा भरतेवेळी आणि सुटताना या रस्त्यावर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेलाही लोखंडी साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळेही वाहतूकीस अडचण होत आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे. मात्र, पदपथावर पालिकेकडूनच अतिक्रमण झाल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे हे पदपथावरील अतिक्रमण कधी मोकळं होणाार असा प्रश्न ठाणेकरांकडून उपस्थित होत आहे.


हेही वाचा – आरे मेट्रो कारशेड : किरीट सोमय्यांनी राज्य सरकारविरुद्ध थोपटले दंड!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -