Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर महामुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांत शिस्तबद्ध रांगा

उपनगरीय रेल्वे स्थानकांत शिस्तबद्ध रांगा

गर्दीच्या नियोजनासाठी प्रवाशांचा पुढाकार

Mumbai

 उपनगरीय रेल्वे स्थानकात लोकल शिरताच प्रवाशांची लोकल पकडण्यासाठीची लगबग सुरू होते. मात्र या लगबगीत बहुतांश वेळा धक्काबुक्की होत असल्याचे पहायला मिळते. अशातच उपनगरीय रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची वाढती संख्या पाहता लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागते. परंतु आता उपनगरीय रेल्वे स्थानकांतील गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रवाशांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लोकल पकडणे, जिने चढ-उतार करणे यासाठी प्रवासी स्वत:हूनच रांगा लावू लागले आहेत. त्यांना आरपीएफची मदत मिळत आहे.

धक्कीबुक्की, जिन्यांवरील गर्दी ही मुंबईच्या लोकल प्रवासाची एक ओळख बनली आहे. वर्षानुवर्षेची ही ओळख पुसून टाकण्यासाठी आता प्रवाशांनीच पुढाकार घेतला आहे. या समस्यांवर आता प्रवाशांनी रांगेचा उतारा शोधून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर याआधी हा प्रयोग राबवण्यात आला होता. प्रवाशांनी सुरूवातीला या प्रयोगाला चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु कालांतराने लोकलच्या गर्दीच्या वेळात रांगा लावण्यावरून झालेल्या वादामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत ही शिस्त प्रवाशांकडून मोडण्यात आली. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वे स्थानकांत लोकलमध्ये चढ-उतार करताना प्रवासी शिस्तबद्धपणे रांगा लावताना दिसत आहेत.

यात दादर, भाईंदर, बोरीवली तसेच कल्याण, बदलापूर या स्थानकांवर प्रवासी रांग लावून लोकल पकडत असल्याचे समोर आले आहे. रांगेच्या शिस्तीचा उपक्रम प्रवाशांनी प्रवाशांसाठी सुरू केला आहे. रेल्वे प्रशासनाकडून या उपक्रमाला पूर्ण सहकार्य देण्यात येत असून रेल्वे पोलिसांकडूनही प्रवाशांना सहकार्य मिळत आहे. परंतु परदेशातील गाड्यांमधील रांगा, मेट्रोसाठीच्या रांगा पाहिल्यानंतर लोकलमध्येही रांगांचा आग्रह धरण्यात येत असला तरी या रांगा गर्दीने भरलेल्या लोकलसाठी उपयुक्त ठरत नाहीत, अशीही नकारात्मक प्रतिक्रिया काही प्रवाशांकडून देण्यात येत आहे.

…तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो
गर्दीच्या काळात प्रवाशांमध्ये संताप निर्माण होण्याची शक्यता आहे. या उलट असे प्रयोग करण्यासाठी पुरेशा गाड्या सोडण्याची गरज असून त्यानंतर जागांची उपलब्धता लक्षात घेऊन असे प्रयोग करण्यास हरकत नाही. परंतु मुंबई लोकलसाठी गर्दीच्या वेळात रांगाचा विषय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतो, असे मत काही प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आले.