मध्य रेल्वेत भटक्या कुत्र्याचा लेडीज डब्यातून प्रवास

Mumbai
dog
रेल्वेत कुत्रा

भटक्या कुत्र्यांची दहशत आता मुंबईच्या रस्त्यांवर मर्यादित राहिलेली नसून रेल्वेच्या हद्दीत आणि लोकलच्या डब्यांमध्येही पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत जात आहे. काल, शुक्रवारी रात्री चक्क वाशी लोकलच्या लेडीज डब्यातून एका कुत्र्याने मनसोक्त प्रवास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लेडीज डब्यात सुरक्षा रक्षक नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.

आणि कुत्रा चक्क लेडिज डब्यात शिरला

…आणि कुत्रा चक्क लेडीज डब्यात शिरला

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 20, 2019

काय आहे घटना 

वाशीला जाणारी लोकल शुक्रावरी रात्री ११.१५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटली होती. ही लोकल गोवंडी स्थानकांवर येताच एका भटक्या कुत्र्याने लेडीज डब्यात प्रवेश केला. त्यामुळे काही काळ महिला प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. सोबतच या कुत्र्याला पाहून महिला प्रवाशांची तारांबळदेखील उडाली होती. गाडी सुरू होण्यापूर्वी महिलांनी त्याला डब्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तितक्यात गाडी सुरू झाली होती. पुढे मानखुर्द रेल्वे स्थानकावर ही लोकल थांबताच हा कुत्रा रेल्वेतून सुखरूप बाहेर पडला. त्यानंतर महिला प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रात्रीच्या कालावधीत प्रत्येक लोकलच्या महिला डब्यात सुरक्षा रक्षक उपस्थित असतात. मात्र हार्बर रेल्वे मार्गावर सुरक्षा रक्षक कमी प्रमाणात किंबहुना नसतातच. जर या भटक्या कुत्र्याने धावत्या लोकलमध्ये अचानक महिला प्रवाशांवर हल्ला केला असता तर मोठा कठीण प्रसंग उद्भवला असता. त्यामुळे या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता, रेल्वे स्थानकांवरील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटना यांनी केली आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर कुत्र्यांच्या सुळसुळाट

हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवर कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत जात असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता तर चक्क भटक्या कुत्र्यांनी रेल्वेतून प्रवासही सुरू केला आहे. या कुत्र्याचा लोकल प्रवास पाहून प्रवासीही थक्क झाले आहेत. लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांना कुत्रा चावण्याची भीती सतावत आहे. भटक्या कुत्र्यांना पकडणे ही महापालिकेची जबाबदारी असली, तरी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र रेल्वे प्रशासनाने पार पाडावी अशी विनंती रेल्वे प्रवासी ग्रुपची अध्यक्षा हर्षा शहानी यांनी ‘दैनिक आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार