लोकल दिरंगाईबद्दल आता रेल्वेला कारणे दाखवा नोटीस

प्रवासी- ग्राहक न्यायालयातही दाद मागणार

Mumbai
Central Railway photo
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे हैराण झालेल्या नोकरदारांनी आता या अव्यवस्थेबद्दल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची मोहीम सुरू केली आहे. टिटवाळ्यातील शेकडो प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकार्‍यांना उपनगरी सेवेच्या दिरंगाईमुळे होणारी नुकसान भरपाई कोण देणार अशा प्रकारचा जाब नोटीशीद्वारे विचारला आहे. दिवसाआड उशीरा असणार्‍या उपनगरीय गाड्यांमुुळे कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागतात.

लेट मार्क लागून कधी कधी वेतनही कापले जाते. त्यामुळे दररोज घरून निघताना कामावर वेळेत पोहोचू की नाही, याचे दडपण प्रवाशांच्या मनावर असते. त्याचा जाब या कारणे दाखवा नोटीशीद्वारे विचारण्यात आला आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा विचार असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. गेले एक ते दीड महिना मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, इंजिन नादुरूस्त, रेल्वे रूळाला तडा जाणे, मेगा ब्लॉक, पॉव्हर ब्लॉक, धुके अशा विविध कारणांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते. अथवा तिचे वेळापत्रक कोलमडते.

परिणामी नोकरदार वर्गाला कार्यालयात पोहोचायला उशीर होतो. ठाणे पलिकडच्या शहरातील नागरिकांना मुंबईत ये-जा करण्यासाठी सध्या तरी रेल्वे हाच एक पर्याय आहे. गेल्या महिन्यात या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी टिटवाळा स्थानकात आलेल्या प्रवाशांविरोधात आरपीएफकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. अगदी स्टेशन मास्तरांकडे असलेली तक्रारवहीसुद्धा प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकार्‍यांना कायदेशीर कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची मोहीम प्रवाशांनी सुरू केली आहे. काहींनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

टिटवाळ्यातील रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष संघटनेचे शेखर काशिनाथ कापुरे यांनी पहिली नोटीस मंगळवारी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठवली आहे. त्यामध्ये त्यांनी सातत्याने होत असलेल्या रखडपट्टीमुळे होणारे नुकसान विषद केले आहे. तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे आपल्याकडून हे नुकसान का वसूल करू नये? असा सवाल त्यांनी यामध्ये केला आहे.

या कारणासाठी नोटीस

शेखर कापुरे यांनी १७ जून रोजी टिटवाळ्यावरून सीएसएमटीकडे जाण्यासाठी ९.१५ ची ट्रेन पकडली. प्रत्यक्षात ही ट्रेन ९.५० वाजता टिटवाळ्यात आली. त्यानंतर दादरला १०.३४ वाजता पोहचण्याऐवजी ११.४७ वाजता म्हणजे दीड तासाहून अधिक उशिरा पोहचली. तब्बल ७३ मिनिटे गाडी उशीराने गेल्यामुळे त्यांना त्रास झाला आहे. त्याचा नोकरीतील विश्वासार्हतेवर परिणाम होतो. हजारो प्रवाशांना या दिरंगाईमुळे त्रास होतो.

इतरही कित्ता गिरविणार
टिटवाळ्यातील इतर प्रवासीही याचा कित्ता गिरविणार आहेत. नोटीस पाठविल्यानंतर रेल्वे प्रशासनाला उत्तरासाठी दहा दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर स्मरणपत्रे पाठवली जाणार आहेत. टिटवाळ्यातील या प्रवाशांच्या मोहिमेत अन्य प्रवाशांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here