घरमुंबईउल्हासनगरमध्ये कुख्यात गुंडावर हल्ला करणारे दोघे अटकेत

उल्हासनगरमध्ये कुख्यात गुंडावर हल्ला करणारे दोघे अटकेत

Subscribe

सुनील शर्मा नावाच्या कुख्यात गुंडावर हातोड्याने हल्ला चढविणाऱ्या दोन जणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.

सुनील शर्मा नावाच्या कुख्यात गुंडावर हातोड्याने हल्ला चढविणाऱ्या दोन जणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा हल्ला उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या इशाऱ्यावरून केला गेल्याचा आरोप शर्माने केला होता. मात्र तपासात अद्याप सुद्धा आमदार कुमार आयलानीचा सहभाग समोर आला नसल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे यांनी सांगितले.

सीसीटीव्हीत आरोपी कैद

उल्हासनगरच्या कॅम्प १च्या गजबजलेल्या शिरू चौकातील एका सीसीटीव्हीमुळे या घटनेचा उलगडा झाला. या सीसीटीव्हीमध्ये सुनील शर्मा हा गुंड मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी मिरचीची पूड शर्माच्या डोळ्यात टाकली. त्यानंतर मागून आलेल्या दोघांनी हातोडा आणि दांडक्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे दिसत होते. या हल्ल्यात शर्मा हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धक्कदायक म्हणजे हा हल्ला उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या इशाऱ्यावरून केला असल्याचे जबाबात शर्माने नमूद केल्यामुळे चर्चेचा विषय झाला होता. आयलानी यांनी मात्र त्याचे आरोप फेटाळून लावले होते. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस हवालदार रविंद्र तायडे, शशिराम गिरी, किशोर शिंदे, बाबासाहेब आव्हाड, पोलीस शिपाई गणेश गोपाळ, वसंत डोळे, प्रफुल्ल सानप यांच्या पथकाने सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तरुणांचा शोध सुरु केला.

- Advertisement -

वादातून शर्मावर हल्ला

उल्हासनगर, कल्याण आणि अंबरनाथ भागातील सीसीटीव्ही मधील तरुणांसारखे दिसणाऱ्या गुंडाचा शोध सुरु झाला. त्यावेळी गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे शहाड फाटक येथे राहणारा इम्रान खान हा सीसीटीव्हीमध्ये दिसत असून तो घरी येणार असल्याचे सांगितले. तिथे पोलीस पथकाने सापळा रचला असता इम्रान खान आणि सुरेश लोंढे हे पकडले गेले. खेमानी येथे रिक्षा चालवत असताना इम्रान खान याचा सुनिल शर्मा बरोबर वाद झाला होता. या वादातून त्याने मित्रांच्या मदतीने शर्मावर हल्ला चढविल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डी. डी. टेळे यांनी दिली.

पोलीस कोठडी

या प्रकरणात चार आरोपींचा समावेश असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. उल्हासनगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -