ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याऱ्या टोळीतील दोघांना अटक

Two arrested for robbing jewelery shop

ठाणे शहरातील कासारवडवली येथील राकेश ज्वेलर्स दुकानात शनिवारी दुपारी घुसलेल्या ४ शस्त्रधारी तरुणांनी ज्वेलर्स मालकावर कोयत्याने हल्ला करून लाखो रुपयांच्या ऐवजासह पोबारा केला. मात्र वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसानी दरोडेखोरांचा पाठलाग करून दोघांना घोडबंदर रोड अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कासारवडवली पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आनंद नगर परिसरात असलेल्या राकेश ज्वेलर्स या दुकानात शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४ शस्त्रधारी तरुणांनी प्रवेश केला, त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानदार सुरेशकुमार सोहनलाल जैन (५६) यांना शस्त्राचा धाक दाखवला. सुरेशकुमार यांनी त्यांना विरोध करताच दोघांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले आणि दुकानातील सोन्याचे दागिने आणि हजारो रुपयांची रोकड घेऊन मोटारसायकलवरून पोबारा केला.

राकेश ज्वेलर्स दुकानात दरोडेखोर घुसल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पळून गेलेल्या दरोडेखोराचा पाठलाग सुरू केला. घोडबंदर रोड येथे एका मोटारसायकल वरील दोघांना ताब्यात घेण्यात आले मात्र दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले. हर्षल राहुल मेश्राम (२३) आणि दिनेश पवार (२५) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने आणि रोकड जप्त करून त्यांच्या जवळील कोयता आणि चॉपर जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसानी दिली. दरोडेखोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरेशकुमार जैन यांना उपचारासाठी रुग्णलायत दाखल करण्यात आले असून कासारवडवली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.