भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

चोरीच्या कारची टँकरला धडक

मुंबईहुन नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या एका टॉयटो कारने आसनगाव नजीक परिवार हॉटेलजवळ सकाळी 8.30 च्या सुमारास एका गॅस टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अशा अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहापूर व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील गंभीर अवस्थेत असलेल्या इतरांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यात नंदलाल कुमार (19 राहणार राजस्थान) व किरण विष्णुई (14) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कार राजस्थान पासिंगची आहे. हा अपघात भीषण होता.

महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साहाय्याने कारमधील चारही मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, अपघातग्रस्त टॉयटो कार ही चोरीची असून कारमधील अपघात मृत्यू पावलेल्या नंदलाल यांच्यावर राजस्थान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती शहापूर पोलिसांच्या तपासात हाती आली आहे. या चोरी झालेल्या कारचा मागोवा घेत राजस्थान पोलीस लोकेशनवर शहापूर येथे पोहचले. मात्र, या कारचा आसनगाव येथे अपघात झाल्याचे राजस्थान पोलिसांना घटनास्थळी आल्यावर समजले. दरम्यान अपघाताचा गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे अधिक तपास करीत आहेत.