माटुंगा, माझगावमध्ये दोन वयोवृद्धांच्या हत्या

Mumbai
आरोपी गाजाआड, सामाजिक संताप व्यक्त

माटुंगा येथे वसंता लक्ष्मीनारायण अय्यर या 79 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी चौघांना शाहूनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्यात एका जोडप्यासह त्यांच्या दोन सहकार्‍यांचा समावेश आहे. विश्वासाने घरात घेतलेल्या पती-पत्नीने चोरीच्या उद्देशाने वसंता यांची हत्या करुन विश्वासघात केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तर माझगाव येथे एका 65 वर्षांच्या वयोवृद्धाची त्याच्याच परिचित तरुणाने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञफ कादर नाखवा असे या मृत वयोवृद्धाचे नाव असून त्यांच्या हत्येनंतर पळून गेलेल्या सुरेश महेशकुमार नावाच्या आरोपी तरुणाला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. अचानक झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी सांगितले. अशा प्रकारे वृद्धांच्या हत्या होत असल्याने समाजातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

माटुंगा येथील हत्या कर्जबाजारीमुळे करण्यात आली असून चोरीचा सर्व मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे. अकबर अमीर बादशहा शेख, समीरा ऊर्फ शानू अकबर शेख, मोहम्मद हसन जावेद अली पटारी आणि मोहम्मद ऐनुल हक अशी या चौघांची नावे असून ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. ही घटना मंगळवारी 19 मार्चला माटुंगा येथील लेबर कॅम्प, मिलिंदनगरच्या मनपा इमारतीमध्ये घडली. या इमारतीच्या ए विंग, तळमजल्यावरील फ्लॅट क्रमांक पाचमध्ये वसंता या वयोवृद्ध महिला राहत होत्या. मंगळवारी त्यांच्या घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने त्यांची ओढणीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर त्याने त्यांच्या अंगावरील दागिने आणि कपाटातील दागिने असा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार त्यांचा पुतण्या प्रमोद प्रभाकरन यांना समजताच त्यांनी शाहूनगर पोलिसांना ही माहिती दिली.

प्राथमिक तपासात ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे शाहूनगर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध चोरीसह हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमेाहीम सुरु असतानाच याच परिसरातील एक जोडपे या घटनेनंतर पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. या माहितीनंतर पोलिसांनी अकबर शेख आणि त्याची पत्नी समीरा ऊर्फ शानू या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी ही हत्या केल्याची कबुली देताना या गुन्ह्यांत इतर दोघांची मदत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी मोहम्मद हसन आणि मोहम्मद ऐनुल या दोघांना पोलिसांनी अटक केली.

तर माझगाव हत्या प्रकरणात अटक केेलेल्या आरोपी सुरेशला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता माझगाव येथील एस.डी नाईक मार्गावरील पेसुमल अ‍ॅण्ड कंपनी, रेल्वे टी स्टॉलसमोर झाली. अश्रफ नाखवा हे डॉकयार्ड रोड येथील नया नगर, हिल व्हयूव इमारतीजवळील कंपाऊंडमध्ये राहत होते. सुरेश हा त्यांचा परिचित असून ते दोघेही मजुरीचे काम करीत होते. गुरुवारी रात्री ते दोघेही पेसुमल अ‍ॅण्ड कंपनी, रेल्वे टी स्टॉलसमोर गप्पा मारीत होते. यावेळी त्यांच्यात अचानक क्षुल्लक कारणावरुन वाद झाला आणि रागाच्या भरात सुरेशने अश्रफ यांच्या डोक्यात तसेच चेहर्‍यावर दगडाने हल्ला केला होता. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अश्रफ यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी तरुण सुरेश महेशकुमार याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. चौकशीत क्षुल्लक वादातून त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here