हेलोवीन पार्टी साजरी करणार्‍या दोघा आयोजकांना अटक

Mumbai
हेलोवीन पार्टी

हेलोवीन पार्टी साजरी करण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता ती मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवणार्‍या दोघांवर ऐरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून या पार्टीसाठी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता. त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करून सोडून देण्यात आले आहे.

ऐरोली येथील खासगी जागेत हुक्का पार्टीचे बेकायदेशीरपणे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे काही ठिकाणी बॅनरदेखील लावण्यात आलेले, शिवाय ठराविक तरुण-तरुणींना निमंत्रित करण्यात आले होते. यासाठी मुलींना व जोडप्यांना प्रवेश मोफत होता, तर एकट्या मुलासाठी हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलेले. मध्यरात्रीपर्यंत चालणार्‍या या पार्टीला हेलोवीन पार्टी असे नाव देण्यात आले होते. याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजय कुंभार यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी खात्री केली असता, ऐरोली सेक्टर ९ येथील खासगी जागेत मोठ्या संख्येने तरुण पार्टीसाठी जमल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. शिवाय पार्टीसाठी दारूचा देखील साठा त्या ठिकाणी करण्यात आला होता.

पोलिसांनी पार्टीसाठी जमलेल्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुले व ९ मुली आढळून आल्या. पार्टीत नशेसाठी अमली पदार्थांचा वापर झाला आहे का, हे सर्वांची वैद्यकीय चाचणी करून सर्वांना सोडून देण्यात आले. मात्र, चाचणीत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तर बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी आयोजित केल्याप्रकरणी करण नरेश पाटील (२४) व मयूर भीमराव मढवी (२५) यांना अटक करण्यात आली आहे. करण मढवीच्या खासगी जागेत ही पार्टी सुरू होती. त्या ठिकाणावरून डीजे मशिन, ७ हुक्का व ४ फ्लेवर तसेच इतर साहित्य असा ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here