धावत्या ट्रेनमधून पडून २ जण दगावले!

Mumbai
two people died by falling from running train at kurla

कुर्ला ते शीव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या ट्रेनमधून पडून दोन तरुण दगावले. तर, एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. हारून कमलउद्दीन अन्सारी (१८) ,आणि फैजल मुबारक सय्यद  (१९) असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावं आहेत. जखमीचे नाव मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. हारून हा कुर्ला पश्चिम येथील न्यू मिल रोड, तानाजी चौक येथे राहणारा असून फैजल आणि जखमी हे दोघे विनोबा भावे नगर या ठिकाणचे रहिवासी होते.

सविस्तर घटना…

रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हे तिघे दादर येथून लोकल ट्रेनने कुर्ला येथे जात होते. हे तिघही ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवास करीत होते. कुर्ला आणि शीव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ट्रेन पोल क्रमांक १४/१४ येथून जात असताना, धावत्या ट्रेनमधून तिघांचा तोल गेला आणि ते एकाचवेळी ट्रेनमधून बाहेर पडले. या अपघातात तिघंहीजण गंभीर जखमी झाले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या तिघांना शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी हारून आणि फैजल या दोघांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, जखमीला उपचारासाठी दाखल करून घेतले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. याप्रकरणी कुर्ला रेलवे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here