जोेगेश्वरीतील दोघेजण विरारमध्ये तलावात बुडून मृत्यू

मुंबईच्या जोगेश्वरी येथून विरार पूर्वेकडील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह रात्री हाती लागले.

जोगेश्वरीच्या हिंद नगर कॉलनी येथील दहा जणांचा ग्रुप दोन बाईक आणि एका कारने विरार पूर्वेकडील भाटपाडा येथील तलावावर आला होता. या ग्रुपमधील महेंद्र मंगेश राणे (वय २५) आणि सूर्यकांत सुवर्णा (वय ३४) हे दोघे तलावाच्या काठावर उभे असताना पाय घसरून पाण्यात पडले. दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचा शोध घेतला असता रात्री त्यांचे मृतदेह हाती लागले.

मंगेश राणे महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत तर सूर्यकांत सुवर्णा एजीएस या खाजगी कंपनीत कामाला होते. कोरोना आपत्तीमुळे पालघर जिल्ह्यात पर्यटनस्थळांवर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही वसई- विरारमधील समुद्रकिनारे, धबधबे आदी पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असताना पहावयास मिळते. पर्यटनबंदी असतानाही वसईतील धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.