नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी दोन शिवसैनिकांना अटक

नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन शिवसैनिकांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे कमलेश कदम आणि आणखी एका सदस्याचा समावेश आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर समता नगर पोलीस ठाण्यात ८ ते १० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई त्या दोघांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण

नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला काही शिवसैनिकांनी एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवसेनेच्या सात गुंडांनी या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप शुक्रवारी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला होता. मुंबईतील कांदिवली भागातल्या शाखा प्रमुखाने ही मारहाण केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला. दरम्यान, हीच बातमी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना गुंडाराज थांबवा, असे म्हटले आहे. या निवृत्त नौदल अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंसंदर्भातील एक व्यंगचित्र व्हॉट्स अॅपवरुन फॉरवर्ड केले होते. त्यावरुन त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या याच दुखापतीचा फोटोही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला फक्त एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार म्हणजे गुंडाराज आहे. उद्धवजी गुंडाराज आवरा. एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला निव्वळ एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली आहे हा सगळा प्रकार निषेधार्ह. घडलेला हा सगळा प्रकार अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे गुंडाराज थांबवा. ज्या गुंडांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा –

काँग्रेस पक्षात बदल; खरगे, गुलाम नबी यांना महासचिव पदावरून हटवले