२० सेकंदात तो दुचाकी घेऊन पसार व्हायचा

कल्याणमध्ये 'मास्टर की'चा वापर करुन दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे.

Kalyan
two-wheeler thief arrested in Kalyan
अवघ्या २० सेकंदात तो दुचाकी घेऊन पसार व्हायचा

चोरी करताना सराईत चोर वेगवेगळ्या शक्कल लढवतात. अशीच एक भन्नाट शक्कल लढवत कल्याणमधील सराईत चोराने अनेक दुचाकी चोरल्या. या चोराने शक्कल लढवून अवघ्या २० सेकंदात कोणतीही दुचाकी घेऊन पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला बुधवारी कल्याण पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आकाश पारचे असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कल्याणमध्ये या चोराला ‘टॅटूमॅन’ म्हणून ओळखण्यात येते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – शहापूरमध्ये खड्ड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी

दुचाकींप्रमाणेच मोबाईल चोरीसुद्धा

कल्याणमध्ये दुचाकी चोरीचे प्रकार काही दिवसांपासून वाढले आहेत. हॉटेल, शोरूम, घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींची चोरी होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. तपासादरम्यान दुचाकी चोरीचा व्हिडीयो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी या चोराचा शोध सुरू केला. काही दिवसात आकाश पारचे या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून कल्याण मधून चोरी केलेल्या ६ दुचाकी हस्तगत केल्या. या चोराने दुचाकींप्रमाणेच मोबाईलसुद्धा चोरले आहेत. आकाशकडून अजून काही दुचाकी आणि मोबाईल मिळण्याची शक्यता आहे. फक्त २० सेकंदात आकाश कोणतीही दुचाकी ‘मास्टर की’च्या साहाय्याने चोरून पसार होत असे. रेकॉर्डवरील हा चोर ‘टॅटू मॅन’ म्हणून ओळखला जातो, अशी माहिती मिळाल्याचे सहाय्यक पोलीस उपआयुक्त अनिल पोवार यांनी सांगितले.