घरमुंबईउध्दव ठाकरेंचा विमा कंपन्यांसह बँकांना १५ दिवसांचा अल्टीमेटम

उध्दव ठाकरेंचा विमा कंपन्यांसह बँकांना १५ दिवसांचा अल्टीमेटम

Subscribe

१६ वा दिवस तुमचा नसेल, शेतकर्‍यांसह तुमच्या पेकाटात लाथ मारु

बँका, विमा कंपन्यांना मी विनंती करतोय की आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका. हा मोर्चा आज आम्ही शांततेत काढला असला तरी १५ दिवसांत शेतकर्‍यांना न्याय दिला नाहीत तर १६ व्या दिवशी हा मोर्चा आक्रमक होईल. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिक विम्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या. १६ वा दिवस तुमचा नसेल. त्या दिवसापासून मोर्चा बोलता होईल.आम्ही शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वांद्रे-कुर्ला येथील मोर्चाच्यावेळी दिला.सरकारने पीक विमा योजना तसेच शेतकरी कर्जमाफीचे पैसे बँका तसेच विमा कंपन्यांकडे जमा केल्यानंतरही अनेक शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘भारती अ‍ॅक्सा’ कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईसह राज्यातील कानाकोपर्‍यातू मोठ्याप्रमाणात शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुलात शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी विमा कंपन्या आणि बँक कंपन्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.

शिवसेनचा हा मोर्चा परिणी इमारतीजवळ पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना, उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्या व बँकांकडून केल्या जाणार्‍या अन्यायाविरोधात जोरदार ताशेरे ओढले. मुंबईमध्ये मुद्दा घेऊन तुम्ही करणार काय, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी, बँका, विमा कंपन्या तसेच अन्य कार्यालये इथे आहेत. या सगळ्या कंपन्यात लंच टाइम होतो. त्या डब्यातील दोन घास ज्याच्याकडून येतात तो शेतकरी उन्हा-पावसाचा विचार न करता राबराब राबतो. रक्त आटवतो, घाम गाळतो, चहू बाजूंनी जेव्हा त्याला संकट ग्रासते,तेव्हा आत्महत्या करून मोकळा होतो. तेव्हा हा मुद्दा फक्त शेतकर्‍यांचा नाही तर जो माणूस म्हणून जगतो आहे त्या माणसाचा हा मुद्दा आहे.

- Advertisement -

तुम्ही अध्यक्ष शोधा!

भाषणाच्या ओघात उध्दव ठाकरेंनी विरोधी पक्षांचा समाचार घेतला, ते म्हणालेे, शिवसेनेवर जे टीका करत आहेत. मोर्चा हा स्टंट आहे असे म्हणत आहेत.त्यातील एक पक्ष असा आहे की ज्यांनी अध्यक्ष हवा म्हणून जाहिरात लावली आहे. तुम्ही अध्यक्षच शोधा आम्ही काय करतो ते शोधू नका. कारण उद्या अध्यक्ष सापडला नाही तर थोड्या दिवसांनी तुम्हाला पक्ष शोधावा लागेल,अशी कोपरखळी मारली. आम्ही काय करायचे हे आम्हाला सांगू नका. आम्ही शिवसेना म्हणून शेतकर्‍यांच्या मागे उभे आहोत. तुम्ही शेतकर्‍यांच्या मागे उभे आहात की जे शेतकर्‍यांवर अन्याय करत आहेत, त्यांच्या मागे उभे आहात, असा सवाल विरोधकांना केला.

ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचे रण पेटले तेव्हा महाराष्ट्राला मुंबई मिळावी यासाठी शेतकर्‍यांनी दिल्लीत धडक दिली. मुंबईसाठी ज्यांनी रक्त सांडले त्यामध्ये शेतकरीही होते. त्या रक्ताशी आम्ही बांधील आहोत. तुम्ही आमच्यावर काहीही टीका करा, या टीकेला आम्ही भीक घालत नाही. आम्ही जे अन्न खाल्ले आहे. त्या अन्नाला आम्ही जागतो आहोत. नमकहराम होणार्‍यांची औलाद तुमची असेल. आमची नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. आपल्यासाठी जवान जे धारातीर्थी पडताहेत ती शेतकर्‍यांची मुले आहेत. जो शेतकरी आपल्या स्वत:च्या पोटची पोर आपल्या देशासाठी सीमेवर लढण्यासाठी देत आहे. तो आपली जबाबदारी घेत असेल तर आपण त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही का, असाही सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्या आणि बँकांच्या कारभाराची अक्षरश: पिसे काढली. मुख्यमंत्र्यांशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी कर्जमाफीचे सर्व पैसे बँकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. जर कर्जमाफीची योजना अंमलात आली असेल व २१ हजार कोटीची कर्जमाफी झाली असेल आणि सरकारने पैसे दिले असतील तर ते पैसे गेले कुठे? आम्हाला हिशेब हवाय. जसा विमा कंपन्यांना इशारा देतोय तसा सर्वच बँकांना इशारा देतोय. विमा कंपन्यांप्रमाणे बँकानीही १५ दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करावेत. विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांची जी प्रकरणे लटकवून ठेवली असतील त्यांना १५ दिवसांच्या आत न्याय द्यावाच लागेल. तो न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर जिथे जिथे विमा कंपन्या असतील त्यांना हा इशारा देतोय,असे सांगत उध्दव ठाकरे यांनी विमा कंपन्यांसह बँकांना १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला.

शिवसेनेने ‘वर्षा’वर मोर्चा काढावा

शिवसेनेने बुधवारी विमा कपंनीवर काढलेल्या मोर्चानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘एकीकडे सत्ता उपभोगायची आणि पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून त्यांना खरोखर शेतकर्‍यांची चिंता असेल आणि त्यांची हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढून दाखवावा,असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले. ‘शिवसेनेने मुंबईत काढलेल्या मोर्चात एकही शेतकरी नव्हता. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतासाठी या मोर्चाचा देखावा असल्याचा आरोपही त्यांनी केला. पीकविमा कंपन्या शेतकर्‍यांची फसवणूक कशी करतात, शेतकर्‍यांना लुबाडून स्वतःचे खिसे कसे भरतात हे पुराव्यानिशी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारच्या निर्दशनाला आणून दिले. तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री बोलला नाही. याची आठवणही वडेट्टीवार यांनी करून दिली.

शिवसेनेकडून शेतकर्‍यांची दिशाभूल

पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्ातील शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. महाराष्ट्ातील शेतकर्‍यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे, त्यावर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जावू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाही,असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -