मनसेने दिले पालिका आयुक्तांना डांबर भेट

उल्हासनगर शहर स्थापना दिनाचे निमित्त

Mumbai

उल्हासनगर शहरातील डांबरी रस्त्याना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली नसल्याने याची आठवण करून देण्यासाठी मनसे उल्हासनगर शहर मार्फत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख याना चक्क डांबर भेट दिले. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेमार्फत खडी आणि ग्रिडने खड्डे भरण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे. तसेच पॉलिमर बेस खड्डे भरण्यासाठी 30 लाख रुपयांचे वेगळे काम देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही वेगाने खड्डे भरण्याचे काम सुरू झालेले नाही.

आठ ऑगस्ट 1949 हा उल्हासनगर शहराचा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने पालिका मुख्यालय मागे स्विमिंग पूल येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यावर कार्यालयाच्या दिशेने जाणारे आयुक्त सुधाकर देशमुख याना विराट अंबे स्पोर्ट्स क्लबच्या गेटवर डांबराने भरलेले गिफ्ट मनसे पदाधिकारी बंडू देशमुख, प्रदीप गोडसे, मनोज शेलार, प्रमोद पालकर, सागर चव्हाण, मैन्नुद्दीन शेख, शाळीग्राम सोनावणे सचिन बेंडके, योगीराज देशमुख आदींनी दिले. याबाबत मनसे पदाधिकारी प्रदीप गोडसे यांनी सांगितले की, उल्हासनगर महापालिकेला भ्रष्टचाराने पोखरले आहे. रस्ते बनविणे आणि खड्डे भरण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. यामुळे मनसेकडून चांगल्या दर्जाचे डांबर शहराच्या स्थापना दिवशी देण्यात आले आहे.