उल्हासनगर पालिका आयुक्तांनी मांडला 549 कोटींचा अर्थसंकल्प

कचरा संकलनासाठी कर आकारणार

Ulhasnagar
Budget

महापालिका प्रशासनाच्या वतीने 2019- 20 या आर्थिक वर्षासाठी 549 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती जया प्रकाश माखिजा यांच्याकडे सुपूर्द केला. या अर्थसंकल्पात राज्यशासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिल्याप्रमाणे कचरा संकलनासाठी नवीन कर आकारण्यात आला आहे. मनपा आयुक्त अच्युत हांगे यांनी मंगळवारी स्थायी समिती सभागृहात हा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पात पाणीपट्टी करातून 158 कोटी, नवीन बांधकाम परवान्यांच्या माध्यमातून 90 कोटी, स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. राज्य शासनाकडून मिळणार्‍या विविध अनुदानाच्या माध्यमातून 243 कोटी रूपये त्यात अमृत योजनेतून 12 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत येण्याची अपेक्षा आयुक्त हांगे यांनी व्यक्त केली आहे.

आस्थापनेवर 122 कोटी, एमआयडीसीच्या थकीत बिलापोटी 33. 44 कोटी, रस्ते विकासासाठी 51 कोटी, कचरा वाहतुकीसाठी 44 कोटी, उद्यानांसाठी 6 कोटी, रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी 10 कोटी, शिक्षण समितीसाठी 61 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन सेवेसाठी अमृत योजनेतून 10 मिनी बसेसची खरेदी केली जाणार आहे. घनकचर्‍याची विल्हेवाट करण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात विविध विकास कामांवर 549.37 कोटी रुपयांचा खर्च होणार असून 8 लाख रूपये पालिकेच्या खात्यात शिल्लक राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here