घरमुंबईउल्हासनगरात २१४ धोकादायक तर ४१ अतिधोकादायक मालमत्ता!

उल्हासनगरात २१४ धोकादायक तर ४१ अतिधोकादायक मालमत्ता!

Subscribe

उल्हासनगर महानगर पालिकेने शहरातल्या धोकादायक आणि अतीधोकादायक इमारती आणि मालमत्तांची यादी जाहीर केली असून यात २१४ धोकादायक तर ४१ अतीधोकादायक मालमत्तांचा समावेश आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात २१४ इमारती धोकादायक तर ४१ मालमत्ता अतिधोकादायक असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. अतिधोकादायक ४१ मालमत्तांवर पावसाळ्यापूर्वी पालिकेची कारवाई कशाप्रकारे असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उल्हासनगर महापालिकेा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. यंदाही पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लांबलचक धोकदायक बांधकामांची यादी जाहीर केली होती. यंदाच्या यादीनुसार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती १ मध्ये ५६, प्रभाग समिती २ मध्ये ५२, प्रभाग समिती ३ मध्ये ७७ आणि प्रभाग समिती ४ मधल्या २९ अशा एकूण २१४ मालमत्ता या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तसेच प्रभाग समिती १ मध्ये २३, प्रभाग समिती २ मध्ये १०, प्रभाग समिती ३ मध्ये 3 आणि प्रभाग समिती ४ मध्ये ५ अशा ४१ मालमत्ता या अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे.

धोकादायक इमारतींवर अशी होते कारवाई

आतापर्यंत उल्हासनगरात कोसळलेल्या इमारतींच्या मलब्याखाली दबून २३ रहिवाशांचा जीव गेला आहे. यामुळे पालिका दरवर्षी पावसाळयापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. तसेच अतिधोकादायक असलेल्या इमारतींची पाणी आणि वीज जोडणी तोडते. त्या इमारती खाली करून सील करते. तसेच ज्या अतिधोकादायक इमारती बाजूच्या इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते, त्या इमारती अजस्त्र क्रेन लावून जमीनदोस्त केल्या जातात.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरमधील वालधुनी नदीपात्राला अनधिकृत बांधकामांचा विळखा

‘या’ इमारती अतीधोकादायक!

अतिधोकादायक इमारतींमध्ये उल्हासनगर कॅम्प २ मधील आसाराम अपार्टमेंट, विनय अपार्टमेंट, सत्यम अपार्टमेंट, गुलमोहर पार्क, उल्हासनगर कॅम्प ३ मधील पद्मा पॅलेस, जय अंबे अपार्टमेंट, उल्हासनगर कॅम्प ४ मधील विनय व्हिला, ज्ञानदीप शाळा, उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलासपती अपार्टमेंट, गजानन मार्केट, होली चाईल्ड शाळा या इमारतींचा समावेश आहे. या यादीच्या अनुषंगाने पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटीस बजावली आहे. प्रभाग समिती २ मधील खेमाणी परिसरातील आसाराम ही तीन माजली इमारत अतिधोकादायक झाल्याने तिची पाणी आणि वीज जोडणी सोमवारी तोडण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी सांगितले.

वर्षभरात गेले ४ जणांचे जीव

उल्हासनगर कॅम्प ३ येथील मेमसाब या इमारतीचा स्लॅब ३ फेब्रुवारी रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत नितू सादीजा (७५), अनिता मौर्या (२५) आणि प्रिया मौर्या (२) हे मृत्युमुखी पडले होते तर इतर ५ जण जखमी झाले होते. उल्हासनगर कॅम्प ५ येथील भाटिया चौकात मुरलीवाला कॉम्प्लेक्स या चार मजली इमारतीचा स्लॅब रविवारी सायंकाळी कोसळला. या स्लॅबखाली दबून लीना गंगवाणी यांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – उल्हासनगरमध्ये चक्क दहा रुपयात साडी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -