ठाण्यात खाडी किनारी मातीचा भराव; अनधिकृत चाळी खारफूटीच्या मुळावर

ठाणेकरांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंग; स्मार्ट ठाणं कसं होणार?

Thane

एकिकडे ठाणे महापालिकेने खाडी किनारी सुशोभित करण्याचे काम हाती घेतले असतानाच, मात्र दुसरीकडे कळवा विटावा खाडी किनारी मातीचा भराव टाकून खाडी खाडी बजवून त्या ठिकाणी अनधिकृत चाळी उभारण्याचा सपाटा भूमाफियांनी लावल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. त्यामुळे अनधिकृत चाळी या खारफुटीच्या मुळावर आल्या आहेत. मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेकडून स्मार्ट ठाण्याचे स्वप्न साकारले जात असतानाच, दुसरीकडे खाडी किनारे बुजवून खारफुटी नष्ट होत असल्याने स्मार्ट ठाणं कसे होणार? असाही सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

ठाणे शहराला निसर्गाचे वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे खाडी किनारी सुशोभित करण्यासाठी पालिकेच्यावतीने एकूण ३२ किमी लांबीचा महत्वकांक्षी खाडी किनारा विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भूमाफियांनी खाडी किनारी मातीचा भराव टाकून खारफूटी नष्ट केले जात आहेत. कळवा येथील दत्तवाडी परिसरात खाडी बजवून अनधिकृत चाळी उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच विटावा गणेशघाट परिसर, मुंब्रा रेतीबंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल मागील आयप्पा मंदिरात लगतच्या खाडी किनारी मोठया प्रमाणात बेकायदा मातीची भरणी टाकली जात आहे. मागील सहा महिन्यांपासून या परिसरात तीनशेच्या आसपास अनधिकृत चाळीची बांधकामे सुरू आहेत.

खाडीकिनारे हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. खाडी किनारी मातीचे भराव टाकून खारफूटी नष्ट करून अनधिकृत बांधकामे उभी राहत असतील तर गंभीर बाब आहे. अशाप्रकारे पर्यावरणाची हानी हेात असेल तर याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वॉटर फ्रंड प्रकल्पातही असे प्रकार घडत आहेत. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र खारफूटी नष्ट करून अनधिकृत चाळीं उभारल्या जात असतील तर त्या विरोधात कांदळवन समितीकडे लक्ष वेधण्यात येईल. – रोहित जोशी, सदस्य, कांदळवन संरक्षण समिती ठाणे 

स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

पावसाळयात कळव्यातील जानकी नगर महात्मा फुले नगर या परिसरात खाडी किनारी भराव टाकून अनधिकृतपणे बैठया चाळी बांधण्यात आल्या आहेत. पावसाळयात या चाळींमध्ये पाणी शिरले हेाते. तसेच चेंदणी कोळीवाडा परिसरातही खारफूटी नष्ट करण्यात आली आहे. खाडीत मातीचा भराव टाकून खारफूटी नष्ट होत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक हितसंबध गुंतले असल्यानेच भूमाफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची दबकी चर्चा ऐकायला मिळते.


वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार