रेल्वेतील जेवणाचा दर्जा समजणार

Mumbai

रेल्वे प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक सुखसुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न करते. त्यातच एक महत्वाची सुविधा म्हणजे रेल्वेत मिळणारे जेवण. मात्र या जेवणाचा दर्जाबाबत तक्रारी वाढत जात आहेत. या तक्रारी कमी करण्यासाठी आणि लांबच्या पल्ल्याच्या प्रवासा दरम्यान प्रवाशांना खानपानाचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीच्या बेस किचनमधून पॅक होणार्‍या जेवणावर क्यूआर कोड लावण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहेत.

ज्यामध्ये एक्स्प्रेस,मेलसारख्या गाड्यांमध्ये मिळणार्‍या जेवणाच्या बॉक्सवर आता क्यूआरकोडचा स्टीकर असणार आहे. त्या क्यूआरकोडवर तुम्ही तुमच्या पेमेट अ‍ॅपवरून स्कॅन केल्यास तुम्हाला जेवणाची इत्यंभूत माहिती या क्यूआरकोडच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. इतकेच नव्हे तर किचनमधील जेवण तयार करण्याचे लाईव्ह व्हिडीओ सुध्दा प्रवाशांना पाहता येणार आहे. याची सुरूवात पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार्‍या मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसपासून झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर लवकर यानंतर मध्य रेल्वेच्या बेस किचनमध्ये ही सेवा लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने दिली आहेत.

रेल्वेत मिळणार्‍या जेवणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी जेवणाच्या बॉक्सवर क्यूआरकोड लावण्यात येत आहे. प्रवाशांच्या जेवणासंबंधी सर्व माहिती या क्यूआर कोडच्या आधारे मिळेल. जसे जेवण कुठल्या बेस किचनमध्ये तयार झाले, किती वाजता पॅक करण्यात आले इत्यादी सर्व माहिती या क्यूआर कोडमुळे मिळेल. या क्यूआर कोडमुळे प्रवाशांना जेवणाची मूळ किंमतही कळेल. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.  -नरेंद्र पिंपिल , जनसंपर्क अधिकारी,आयआरसीटीसी

क्यूआरकोडचे काय फायदे ?
-जेवणाची किंमत कळेल
-जेवणाचा दर्जा कळेल
-जेवण किती आहे हे कळेल
– पदार्थ तयार करण्याची वेळ कळेल
– पदार्थ तयार केलेले स्थळ कळेल
– जेवण तयार करण्याचे लाईव्ह व्हिडीओ
– जेवणची पॅकिंग डेट
-तक्रार करण्यास सुविधा
-कोणत्याही पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून शक्य