घरमुंबईजन्मदिनाच्या त्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

जन्मदिनाच्या त्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

Subscribe

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता निधीला भेट देत मुख्यमंत्र्यांना वाढदिवसा दिनी अनोखी भेट दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल जन्मदिवस होता. मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच आवाहन केल्याप्रमाणे त्यांचा जन्मदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट मिळाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाल्याने मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १०१ रुपयांची मदत पाठविली.

लहानग्या वेदांतला मुख्यमंत्र्यांची मदत

औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार हा ५ वर्षीय मुलगा पित्ताशयाच्या कर्करोगाने पिडीत होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्यापरीने मदत करून त्यावर उपचार सुरु केले. मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अडचणीचे ठरू लागले. पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. या बालकाची आत्या रेणूका गोंधळी या नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता.नेवासा) येथे राहतात. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईल दूरध्वनी माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ १ लाख ९० हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पीटलमध्ये वेदांतवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे या बालकाला जीवनदान मिळण्यास मदत झाली.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रेणूका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले. या निधीसोबत रेणूका गोंधळी यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्या म्हणतात की, ”आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवित आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.”

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा शुभारंभ अमित शहा तर समारोप नरेंद्र मोदी करणार

मुख्यमंत्री सद्गदित झाले

रेणूका गोंधळी यांचे हे पत्र वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रूच तरळले. आज जन्मदिनानिमित्त त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने शुभेच्छा प्राप्त झाल्या. मात्र, ज्या घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असतात. त्याच शेवटच्या घटकाचा प्रतिनिधी असणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाकडून शुभेच्छांसोबत प्राप्त झालेली ही छोटीशी परंतु खूप मोलाची असणारी मदत आल्याचे पाहून मुख्यमंत्री सद्गदित झाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री सहायता निधीला भेट

आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा मान राखत विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे १.७५ कोटी रूपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वच देणगीदारांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी संदेशाद्वारे तसेच दूरध्वनी करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, डॉ. हर्ष वर्धन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री मनिषा कोईराला, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच इतरही विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती राजराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -