विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा एटीकेटी परीक्षेला फटका; विद्यार्थ्यांकडून संताप

अंतिम वर्षाच्या परीक्षेत समानता नसल्याचा आरोप प्राध्यापकांकडून होत असताना शुक्रवारपासून सुरु झालेल्या एटीकेटी परीक्षेला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला.

mumbai university
मुंबई विद्यापीठ

अंतिम वर्षाच्या परीक्षेत समानता नसल्याचा आरोप प्राध्यापकांकडून होत असताना शुक्रवारपासून सुरु झालेल्या एटीकेटी परीक्षेला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला. ऑनलाईन परीक्षा सुरु झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना लिंक न मिळाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला, तसेच एटीकेटीच्या परीक्षेबाबत प्राध्यापकांकडून सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत एजन्सीवर विश्वास दाखवल्यानेच परीक्षेवेळी मोठा गोंधळ उडाल्याचा आरोप  प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या एटीकेटीच्या ऑनलाईन परीक्षा शुक्रवारपासून घेण्यास मुंबई विद्यापीठाकडून सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्याच दिवशी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवलेली आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कंपनीकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी सराव प्रश्नसंच पाठवणे, विद्यार्थ्यांना हॉलतिकीट पाठवणे, त्यांना परीक्षेसाठी लिंक पाठवणे अशी जबाबदारी होती. परंतु  सकाळी १० वाजता असलेल्या लाईफ सायन्स परीक्षेच्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत लिंकच मिळाली नाही. त्यामुळे पेपर कसा द्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून परीक्षा विभागाला वारंवार फोन करून विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळाली त्यांचीच परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षानंतर घेण्यात येईल, असे विद्यापीठाकडून उत्तर मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 
परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाच्या पातळीवर कोणतीही यंत्रणा तयार नाही. त्यामुळे परीक्षेबाबत शिक्षकांकडून विद्यापीठाला काही सूचना करण्याबरोबरच प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. मात्र शिक्षकांना ऑनलाईन परीक्षेबाबत विश्वासात न घेता त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. अंतिम वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बनवणे, त्याचे नियोजन करणे यासाठी कमी वेळ असल्याने प्राध्यापक दिवसरात्र काम करत आहेत. ऑनलाईन एटीकेटी परीक्षेसाठीही विविध विभागाचे प्रमुख आणि शिक्षक गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत तयारी करत होते. परंतु विद्यापीठाच्या मनमानी कारभारामुळे आणि एजन्सीच्या नाकरतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मॅपिंग झाले नाही त्यामुळे त्यांना हॉलतिकीट व परीक्षेची लिंक पाठवणे विद्यापीठाला शक्य झाले नाही. त्यामुळे परीक्षा सुरु होऊन दोन तास उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना यूजर आयडी आणि लिंक मिळू शकली नाही. परिणामी ऐन परीक्षेवेळी मोठा गोंधळ उडाला.    

विद्यार्थ्यांनी बायकॉट केलेल्या एजन्सीला कंत्राट 

मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे कंत्राट मणीपालमधील एका एजन्सीला दिले आहे. परंतु सिस्टीम तकलादू असल्याने तेथील विद्यापीठातील विद्यार्थ्यानी ही सिस्टीम रद्द करण्यासाठी आंदोलन केले होते. त्याच एजन्सीला मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले आहे. विद्यार्थ्यांनी रद्द केलेली सिस्टीम मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांवर लादू पाहत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. 
एटीकेटीच्या कोणत्याही परीक्षा रद्द झालेल्या नाहीत. काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक मिळू शकली नाही. ज्यांना लिंक मिळाली त्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लिंक न मिळालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेण्यात येईल. 
– विनोद पाटील, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ