कोरोनावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन करत असलेल्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संशोधक विद्यार्थी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Mumbai

फेलोशिपच्या मागणीसाठी पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलने केल्यानंतरही मुंबई विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन करत असलेल्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संशोधक विद्यार्थी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० च्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फेलोशिप मुंबई विद्यापीठाने अद्याप दिलेली नाही. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ११ व ११ मार्च रोजी विद्यापीठात बेमुदत आंदोलनही केले. यानंतर १२ मार्चला कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासोबत विद्यार्थ्यांची बैठक झाली. त्यावेळी फेलोशिप आठवड्याभरात देण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांना अद्यापही फेलोशिप मिळालेली नाही. पीएचडीला असणारे बरेच विद्यार्थी हे आर्थिक अत्यल्प गटातील आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण फेलोशिपवर अवलंबून आहे. फेलोशिप न मिळाले काही विद्यार्थी हे कोरोनावर संशोधनही करत आहेत.

जगभरात संशोधनाला प्राधान्य देण्यात येत असताना मुंबई विद्यापीठाने पीएचडीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मुंबई विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजीसह विविध विभागाचे विद्यार्थी कोरोनावर संशोधन करत आहेत. अनेकांनी आपले रिसर्च पेपर विद्यापीठाकडे जमाही केलेले आहेत. असे असतानाही त्यांना हक्काची फेलोशिपपासूनही वंचित राहावे लागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले असतील, सर्व कामे जर चालू असतील तर मग विद्यार्थ्यांसोबत अन्याय का, असा सवाल छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाने घेतली आहे. वित्त विभागाचे काम सुरू होताच विद्यार्थांना फेलोशिप मिळेल, असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.