क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनात मुंबई विद्यापीठ अव्वल!

Mumbai
University of Mumbai tops in sports, cultural and research

क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधन या तिनही क्षेत्रातील स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. या स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठीने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राजभवन आयोजित क्रीडा महोत्सव, इंद्रधनुष्य आणि अविष्कार या तिनही स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने विजयाची मोहोर उमटवली आहे. एक नजर टाकूया, पहिलं स्थान पटाकवलेल्या मुंबई विद्यापीठाने तिनही क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर…

क्रीडा महोत्सव

१४-१८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने दमदार कामगिरी करत ३५० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. बास्केट बॉल (पुरुष आणि महिला), कबड्डी (महिला ), खो-खो (महिला आणि पुरुष), व्हॉलीबॉल (पुरुष) गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर कबड्डी (पुरुष) द्वितीय स्थान, एथलेटिक (पुरुष आणि महिला) गटात तृतीय स्थान आणि व्हॉलीबॉल (महिला ) चतूर्थ स्थान पटकावले आहे.त्याचबरोबर जनरल चॅम्पिअनशिप टीम इव्हेंट रोटॅटिंग ट्रॉफी पुरुष गटातून १९० गुणांसह आणि महिला गटातून १६० गुणांसह मुंबई विद्यापीठाने ३५० गुणांची कमाई करत ओव्हरऑल चॅम्पिअनशिप ट्रॉफी पटकावली आहे. सलग तीनवेळा क्रीडा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने वर्चस्व गाजविले आहे.

इंद्रधनुष्य

१६ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ मध्ये मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने तब्बल १५ वेळा हा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविला आहे. वांड्मय, ललितकला, संगीत, नाट्य आणि नृत्य या स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ८७ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेते पद मिळवून अव्वलस्थान पटकावलं आहे. तर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यापीठास ४८ गुण मिळाले आहेत. या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील १९ विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, वाद-विवाद, रांगोळी, मातीकाम,पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य समूह गायन, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य या विभागांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबत विविध स्तरावरील सर्वसाधारण चषकांमध्ये ललितकला विभाग, संगीत विभाग, नाट्य विभाग आणि नृत्य विभागात प्राविण्य मिळविले आहे.

अविष्कार संशोधन स्पर्धा

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे १५ ते १८ जानेवारी २०१९ दरम्यान पार पडलेल्या १३ व्या आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ५८ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करत आठ सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांची कमाई करत अविष्कार संशोधन स्पर्धेवर मुंबई विद्यापीठाची सलग दुसऱ्या वर्षी विजयी मोहोर उमटली आहे. यामध्ये मानव्यविद्या, भाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी,मुलभूत शास्त्रे, शेती व पशू संवर्धन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे. वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र आणि मूलभूत शास्त्रे या गटातील विजेतेपदही विद्यापीठाने प्राप्त केले. विद्यापीठाच्या वतीने या स्पर्धेमध्ये एकूण ४८ संशोधक सहभागी झाले होते.

राजभवन आयोजित क्रीडा, सांस्कृतिक आणि संशोधनाच्या तीन्ही स्पर्धातील मुंबई विद्यापीठाच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आज राज्य स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक होतो आहे. याचा विशेष आनंद होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा – प्रोफेसर सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here