उल्हासनगरात टोळक्याची दहशत; रात्रीच्या वेळी १३ गाड्या फोडल्या!

उल्हासनगरमध्ये एका टोळक्याने रात्रीच्या वेळी परिसरातल्या गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai
ulhasnagar attack
उल्हासनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्या गाड्या

तोंडाला रुमाल बांधलेल्या पाच ते आठ जणांच्या टोळक्याने उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ मध्ये असणाऱ्या लालचक्की परिसरात तब्बल १३ वाहनांची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यात कार आणि रिक्षांचा समावेश असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तोंडाला रुमाल बांधून आले भामटे

सार्वजनिक मित्र मंडळ, गुरद्वारा समोर स्थानिक नागरिक त्यांच्या कार, रिक्षा उभ्या करतात. काल मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने हातात सळई, दांडके घेऊन पार्किंग केलेल्या चार आणि तीन चाकी वाहनांची तोडफोड केली. उपजीविकेची तोडफोड झाल्याने रिक्षाचालकांची उपासमार होणार असल्याने त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे आपली तक्रार मांडली आहे. या प्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा शोध सुरु केला आहे.

लालचक्की, सुभाष टेकडी, भरतनगर, पाण्याची टाकी आदी भागात असामाजिक तत्वांचा वावर असल्याने वारंवार हाणामारीच्या घटना इथे घडतात. या भागात नशाखोरीचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी सातत्याने पोलीस गस्त वाढली तर नागरिकांना निर्भयतेने जगता येईल, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here