कलिना कॅम्पसचा वाहनतळासाठी वापर

भाजप पक्ष स्थापनादिनासाठी कॅम्पसमधील जागेवर परवानगीविना पार्किंग

Mumbai
Kalina

मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसचा वापर शैक्षणिक कारणांपेक्षा वेगळ्याच गोष्टींसाठी करू लागले आहे. प्रशासनाने कलिना कॅम्पसमधील जागा वाहनतळासाठी भाड्याने देण्याचा सपाटा लावला आहे. परंतु गेल्या वर्षी 6 एप्रिल या भाजप पक्ष स्थापना दिनी कलिना कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करण्यात आली. प्रत्यक्षात पार्किंगसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणताही पत्रव्यवहार अथवा लेखी परवानगी आयोजकांना दिली नसल्याची, बाब माहिती अधिकारात उघड झाले आहे.

विद्यापीठाकडून कलिना कॅम्पसचा वापर शैक्षणिक कामांव्यतिरिक्त होऊ लागला आहे. विद्यापीठामार्फत खासगी संस्था आणि व्यक्तींच्या कार्यक्रमासाठी वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांनी माहिती अधिकारातून माहिती मागविली होती. विद्यापीठाच्या प्रशासन विभागाने दिलेल्या उत्तराने कलिना कॅम्पसमधील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

6 एप्रिल 2018 रोजी भाजपाचा पक्षस्थापना दिवस बीकेसीमध्ये झाला. या कार्यक्रमासाठी आलेल्या गाड्यांना पार्किंगसाठी कॅम्पसमधील जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, याबाबतचा पत्रव्यवहार प्रशासन विभागामार्फत झाला नसल्याचे, उत्तर विद्यापीठाने माहिती अधिकारात दिले आहे. एखादा विद्यार्थी गाडी घेऊन कॅम्पसमध्ये येत असताना त्याच्याकडे ओळखपत्र नसल्यास विद्यापीठातील सुरक्षा रक्षक त्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारतात. मात्र, एखाद्या राजकीय पक्षाच्या सभेल्या आलेल्या गाड्या पार्किंगसाठी कालिना कॅम्पसमध्ये कोणत्या नियमाने सोडल्या जातात किंवा त्यासाठी कोणाचा फोन आला होता, हे कुलगुरुंनी स्पष्ट करावे अशी मागणी संघटनेचे सचिव शिवराज कांबळे यांनी केली आहे.

विद्यापीठाने 1 मार्च 2018 रोजी आगा खान फाऊंडेशन या संस्थेला कालिना कॅम्पसमधील जागा वापरासाठी दिली होती. जागा देण्याबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी फोनवरून प्रशासकाकडे विनंती केली. या कार्यक्रमासाठी चाळीस हजार आमंत्रित आणि 800 गाड्या पार्किंगसाठी अपेक्षित होत्या. त्यासाठी विद्यापीठाची जागा 12 फेब्रवारी ते 5 मार्च म्हणजे तब्बल 21 दिवस संस्थेला देण्यात आली. त्या बदल्यात 25 लाख रुपये जागेचे भाडे व दोन लाख नव्वद हजार रुपये पार्किंगचे भाडे घेण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी असलेले क्रिकेटचे मैदान संस्थेला दिल्याने या कालावधीत विद्यार्थी मैदानाचा वापर करू शकले नाहीत.

कोणी कोणी केला वापर
खासदार पुनम महाजन यांच्या खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांसाठी सुध्दा कॅम्पसमधील जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला यांच्या खासगी कार्यक्रमासाठी सुध्दा कालिना कॅम्पसमधील जागा पार्किंगसाठी दिली. तर पोद्दार स्कूल या खासगी शाळेला सुध्दा पार्किंगसाठी जागा देण्यात आल्याचे, उत्तर विद्यापीठाने माहिती अधिकारात दिले आहे.

कालिना कॅम्पसचा वापर शिक्षणासाठी कमी व पार्किंगसाठी जास्त करत आहे. विद्यापीठ हे खासगी व राजकीय कार्यक्रमासाठी नसून तिथे शिक्षण दिले पाहिजे. प्रशासन पार्किंगला प्राधान्य देणार असेल तर आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन सुध्दा पैसे भरून कुलगुरूंच्या बंगल्यासमोर पार्किंगची मागणी करेल.
– सचिन मनवाडकर, अध्यक्ष, आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन

प्रशासनाने माहिती अधिकारात काय उत्तर दिले आहे. याची माहिती घ्यावी लागेल. यानंतरच याविषयी सविस्तर बोलता येईल.
– डॉ. अजय देशमुख, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ