घरमुंबईएफडीएच्या चाचणीत विको वज्रदंती सदोष

एफडीएच्या चाचणीत विको वज्रदंती सदोष

Subscribe

ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक नियम १९४० नुसार दंतमंजनमधील ड्राय वेटचे प्रमाण हे ७ ते ९ टक्क्यांपर्यंत असणे बंधनकारक आहे. मात्र विकोच्या पावडरमध्ये हे प्रमाण ५.१२ टक्के इतके आढळले. कारणे दाखवा नोटीस बजावली; प्रशासकीय कारवाईची शक्यता

‘आयुर्वेदिक जडीबुटिया दंत और गमस बनाये हेल्दी…’ अशी जाहिरात करणार्‍या विकोच्या ‘वज्रदंती’ या दंतपावडरचे नमूने सदोष आढळल्याने महाराष्ट्राच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) विको कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. विकोची वज्रदंती दंत पावडर ड्राय वेटच्या चाचणीमध्ये नापास झाली असून ती वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल एफडीएने दिला आहे. त्यामुळे विकोवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली विभागाने जुलै २०२० मध्ये विकोच्या वज्रदंती या दंत पावडरच्या एन००४२ या बॅचमधील नमूने तपासणीसाठी घेतले. या बॅचमधील उत्पादन मे २०१९ मध्ये झाले असून, त्यांची मुदत एप्रिल २०२१ होती. हे नमूने सांगलीहून मुंबईतील मुख्य कार्यालयातील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रयोगशाळेमध्ये झालेल्या तपासणीचा अहवाल सप्टेंबर २०२० मध्ये आला. या अहवालामध्ये विकोच्या वज्रदंती या पावडरमध्ये ड्राय वेटचे प्रमाण हे निश्चित मानकाच्या तुलनेत फारच कमी असल्याचे आढळून आले. ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक नियम १९४० नुसार दंतमंजनमधील ड्राय वेटचे प्रमाण हे ७ ते ९ टक्क्यांपर्यंत असणे बंधनकारक आहे. मात्र विकोच्या पावडरमध्ये हे प्रमाण ५.१२ टक्के इतके आढळले. ड्राय वेटचे प्रमाण कमी असल्याने हे उत्पादन प्रमाणित दर्जाचे नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून सप्टेंबरमध्ये सांगली व नागपूर येथील एफडीएच्या कार्यालयाला पाठवण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर एफडीएने बाजारातील सर्व उत्पादन मागे घेण्याचे आदेश विको कंपनीला देत कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. एफडीएने दिलेल्या आदेशानुसार विकोने तातडीने बाजारातील उत्पादन मागे घेतले आहे. विकोकडून येणार्‍या उत्तरानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. मात्र विको वज्रदंती हे उत्पादन वापरण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेच्या चाचणीत स्पष्ट झाल्याने कंपनीवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएच्या अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

vicco

सदोष आढळलेले नमून्यांसदर्भात अधिक तपास करायचा किंवा खटला चालवायचा असल्यास १५ दिवसांत कळवण्यात यावे. जेणेकरून सदोष नमूने जतन किंवा नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे अहवालामध्ये म्हटले आहे. परंतु लाखो लोकांच्या आरोग्य धोक्यात आणणारे उत्पादन बाजारात आणल्याप्रकरणी विको कंपनीवर खटला चालवण्याऐवजी एफडीएकडून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विको कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न एफडीएकडून करण्यात येत असल्याचा आरोप ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.

- Advertisement -

काय असते प्रशासकीय कारवाई

प्रशासकीय कारवाईमध्ये तीन प्रकारच्या कारवाई केली जाते. यामध्ये कंपनीचे उत्पादन काही दिवसांसाठी बंद केले जाते. कंपनीने केलेले उत्पादन रद्द करण्यात येते आणि कंपनीला सूचना देण्यात येतात. या तीनपैकी कोणतीही एक कारवाई संबंधित कंपनीवर करण्यात येते.

प्रशासकीय कारवाई ही किरकोळ प्रकरणांमध्ये केली जाते. विकोचे दंतमंजन हे लाखो लोक वापरतात. लोकांचे आरोग्य धोक्यात आणणारे उत्पादन बाजारात आणल्याप्रकरणी विकोविरोधात न्यायालयात खटला चालवण्यात यावा. जेणेकरून कंपनीला जरब बसण्यास मदत होईल.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -