सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे मनसेकडून उल्लंघन

Mumbai
firecrackers banned in Diwali between 8 to 10 pm
दिवाळीत फटाक्यांवर ८ ते १० यावेळेत बंदी

दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या वेळेला मनसेने केराची टोपली दाखवली आहे. शिवाजी पार्क येथे मनसेने आज दीपोत्सव साजरा केला. यावेळी मनसेकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दीपोत्सवाचे उदघाटन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते.

आम्ही उल्लंघन केलंच नाही – मनसे

दरम्यान याबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “हिंदु धर्मानुसार उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. आम्ही दिवाळीच्या आधी फटाके फोडलेत. महाराष्ट्रात धनत्रयोदशी पासून दिवाळी सुरू होते. सुप्रीम कोर्टाने दिवाळीमध्ये वेळेचे बंधन घातले आहे. पण आम्ही दिवाळी आधी फटाके फोडल्याने आम्ही नियमांचे उल्लंघन केले नाही.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सुप्रीम कोर्टाने कधी दिवाळी साजरी होते आणि कधी संपते हे सांगितले नसल्याचेही देशपांडे यावेळी म्हणाले.

कोर्टाचा आदेश काय आहे

फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला होता. यानुसार दिवाळी दरम्यान रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. पण, ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या रात्री १२ वाजेपर्यंत फटाके फोडण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतर तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन सकाळी आणि रात्री अशा दोन वेळात फटाके फोडण्याची मुभा मागितली होती. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला फटाके फोडण्याच्या वेळा ठरवून देण्याचे अधिकार दिले होते. मात्र दोन तासांच्या वर फटाके फोडण्याची अनुमती देता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते.

फटाके फोडण्यापूर्वी कोर्टाच्या ‘या’ अटी, घ्या जाणून

वायू प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात फटाक्यांचे उत्पादन-विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (२३ ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दिवाळी साजरी करा, पण या वेळेतच फटाके फोडा दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून देण्यात आली आहे. संध्याकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. केवळ दोन तासांमध्ये फटाके फोडण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडून मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here