घरमुंबईउद्धव यांच्या सहभागाला पीएमओ संमतीची प्रतीक्षा

उद्धव यांच्या सहभागाला पीएमओ संमतीची प्रतीक्षा

Subscribe

मोदी आणि अमित शहांविरोधात आरोपांचा पाढा सुरू ठेवण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेने युतीतील बेबनाव पुन्हा वाढू लागला आहे. एकीकडे उध्दव ठाकरे आणि शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न राज्यातल्या भाजप नेत्यांकडून होत असताना मोदींच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या सहभागाला पंतप्रधान कार्यालयानेच अद्याप संमती दिली नसल्याचे सांगण्यात येते. प्रदेश भाजप गेल्या काही दिवसांपासून या संमतीसाठी पीएमओच्या संपर्कात आहे. पण त्यांना अजिबात दाद दिली जात नसल्याची माहिती मिळते. कल्याणच नव्हे तर पुण्याच्या कार्यक्रमापासून उध्दव यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न मागल्या दारातून सुरू आहे. म्हणूनच मुंबईच्या कोस्टल रोडचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन करण्याआधीच ते उध्दव ठाकरेंच्या हस्ते उरकण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 डिसेंबरला राज्यातल्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. कल्याणच्या शेवटच्या मेट्रो प्रकल्पाबरोबरच मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे आणि मुंबईतल्या कोस्टल रोडचेही भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाला उध्दव ठाकरे यांना बोलवण्याचा भाजपच्या नेत्यांचा आग्रह आहे. युतीतील दुरावा कमी करण्यासाठी उध्दव यांना मोदींबरोबर आणण्याचा प्रयत्न राज्यातल्या भाजप नेत्यांचा आहे. बदलत्या राजकीय समीकरणात उध्दव ठाकरे यांना या कार्यक्रमाला बोलवणे आवश्यक असल्याचे भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना वाटते. मात्र पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील नेत्यांना पीएमओच्या संमतीशिवाय संधी दिली जात नाही.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दिल्लीत प्रयत्न केले. पण त्यांनाही दाद देण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा झाली. यावेळी प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेनेला सहभागी करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आग्रही भूमिका मांडली. पण त्यास अजून पंतप्रधान कार्यलयाने अधिकृत मंजुरी दिलेली नाही. यामुळेच हा कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना उध्दव यांना या सोहळ्याचे निमंत्रणच देण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले. उध्दव यांच्याकडून नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याबरोबरच भाजप नेत्यांविरोधात केल्या जाणार्‍या प्रखर टीकेची दखल मोदींकडून घेतली जात असते. याचाच भाग म्हणून पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या बरोबरीने उध्दव ठाकरेंच्या सहभागाला अद्याप संमती दिली नसल्याचे कळते. पीएमओच्या या कृतीची दखल घेत शिवसेनेने आपल्या अखत्यारातील मुंबईत होऊ घातलेल्या कोस्टलरोडचे भूमीपूजन मोदींच्या आधीच उरकण्याचे ठरवल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -