Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई दोन वर्षांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत; विद्यापीठाचा अनागोंदी कारभाराचा फटका

दोन वर्षांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत; विद्यापीठाचा अनागोंदी कारभाराचा फटका

रात्र महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या १२ विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून निकालाची गुणपत्रिकाच देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी व पुढील शिक्षणापासून मुकावे लागले आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाचे परीक्षा विभाग आणि वाद हे समीकरण घट्ट झाले आहे. परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका दरवर्षी विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. मात्र रात्र महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या १२ विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून निकालाची गुणपत्रिकाच देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी व पुढील शिक्षणापासून मुकावे लागले आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता न आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी रात्र महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. दिवसभर काम करून अनेक विद्यार्थी रात्री शिक्षण घेतात. रात्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. नोकरी व व्यवसाय करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी रात्र महाविद्यालय दिलासा ठरते. मात्र मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थ्यांवर ‘शिक्षण नको’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रियदर्शनी नाईट सिनियर कॉलेजच्या कॉमर्स शाखेतील १२ विद्यार्थ्यांचे अंतिम सत्राच्या निकालाची गुणपत्रिका दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आलेले नाहीत. यामध्ये २०१९ पासून १० विद्यार्थ्यांना तर, २०१५ पासून दोन विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आली नाही. अंतिम वर्षाची गुणपत्रिका मिळावी यासाठी विद्यार्थी वारंवार परीक्षा विभागाकडे फेर्‍या मारत आहेत. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडून आकारलेला दंडही भरला आहे. मात्र तरीही परीक्षा विभाग विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास टाळाटाळ करत आहे. निकाल प्रलंबित का ठेवण्यात आला आहे, याबद्दलही परीक्षा विभागाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे प्रलंबित ठेवलेले निकाल मिळावे यासाठी महाविद्यालयाकडूनही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विनंती करण्यात आली आहे. मात्र गुणपत्रिका देण्यासाठी परीक्षा विभागातील काही अधिकार्‍यांकडून पैशांची किंवा भेट वस्तू देण्याची मागणी करण्यात येत आहे. परीक्षा विभागाच्या या मागणीसमोर महाविद्यालयही हतबल ठरले आहे. परीक्षा विभागाने गुणपत्रिका न दिल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या तसेच पुढील उच्च शिक्षणाच्या संधी गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा विभागातील काही लालची अधिकार्‍यांच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

परिस्थिती नसतानाही काम करून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी विद्यापीठाकडून त्याचे खच्चीकरण करण्यात येत आहे. रात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबाबत भेदभाव करू नये. परीक्षा विभाग दोन वर्षे त्यांच्या भवितव्याशी खेळत आहे, हे अत्यंत दयनीय आहे. विद्यापीठाने याचा गांभीर्याने विचार करावा.
– सुधाकार तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
परीक्षेची गुणपत्रिका मिळावी यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांनी दंडही भरला आहे. परंतु काही अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. वारंवार विनंती करूनही परीक्षा विभाग विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार प्रचंड त्रासदायक आहे.
– प्रकाश मखिजा, मुख्याध्यापक, प्रियदर्शनी नाईट सिनियर कॉलेज
- Advertisement -