भिंत भेदण्याची तिची धडपड निष्फळ!

Mumbai
malad wall collapse

ढीगार्‍याखालून मदतीसाठी येणारा तिचा आवाज… एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे तिला वाचवण्यासाठी सुरू असलेले २४ तासांपासूनचे प्रयत्न अखेर व्यर्थ गेले. बचाव पथक तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतानाच तिचा जीव गेला. ती होती दुर्दैवी दीपा ननावरे. ही मुलगी भिंत अंगावर कोसळल्यापासून मदतीसाठी हाक मारत होती. पण, ढिगार्‍याखालून नेमका कुठून आवाज येतोय, याचा अचूक अंदाज एनडीआरएफच्या जवानांना येत नव्हता. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेले शोधकार्य मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते. तिचा निपचित पडलेला देह बघून उपस्थितांचे डोळे पाणावले.

एक व्यक्ती आत शिरु शकेल एवढे खोदकाम जवानांनी केल्यानंतर हळूहळू या मुलीचा एक हात दिसला. त्यानंतर त्याच दिशेने जवान शोधकार्य करु लागले. तिचे अर्धे शरीर ढिगार्‍याच्या आत होते. शरीराच्या डाव्या बाजूला सळ्या, भिंतीचा ढिगारा आणि काही लाकडी वस्तू होत्या. त्यात सतत पडणारा पाऊस आणि चिखल यामुळे तिला कसे बाहेर काढावे हाच प्रश्न जवानांसमोर होता. तिला श्वास घेण्यासाठी डॉक्टरांच्या सहाय्याने अ‍ॅम्ब्यूलन्समधील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. साडेबाराच्या सुमारास तिने एनडीआरएफ जवानांकडे पिण्याचे पाणी मागितले, असेे प्रत्यक्षदर्शी सांगतात. पण, ते पाणी अखेरचे ठरले. कारण अग्निशमन जवानांनी त्या मुलीचे शरीर ढिगार्‍याबाहेर काढले खरे, पण त्या शरीरातून प्राण निघून गेलेला होता. पहाटेपासूनच या मुलीला ढिगार्‍याखाली शोधण्याचे काम सुरू झाले होते. मंगळवारी पावणेतीनच्या सुमारास या मुलीला जवानांनी बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या मुलीचे नातेवाईक कुठे आहेत? याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मालाडच्या आंबेडकरनगर आणि पिंपरीपाडा परिसरातील संरक्षक भिंत सोमवारी मध्यरात्री अचानक अंगावर कोसळल्याने इथल्या तब्बल २१ जणांना जीव गमवावा लागला. त्यातच ही मुलगीदेखील होती.

ननावरे कुटुंबावर काळाचा घाला
मुंबईत मंगळवारी घडलेल्या मालाड भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत पिंपरीपाडा परिसरातील ननावरे कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत संपूर्ण ननावरे कुटुंबातील सदस्य मृत्यूमुखी पडल्याची दुदैवी घटना घडली आहे. यात संचिता ननावरे, ४ वर्षीय परशुराम ननावरे, ३५ वर्षीय राणी ननावरे आणि ४० लक्ष्मण ननावरे हे एकाच कुटुंबातील ४ जणांवर रात्री अचानक भिंत कोसळली आणि या घटनेत हे चौघेही मृत्यूमुखी पडले. यापैकी संचिताचे वडील लक्ष्मण ननावरे आणि भाऊ परशुराम ननावरे या दोघांना रात्रीच ढिगार्‍याबाहेर काढण्यात आले. तर, तिची आई राणी ननावरे हिला सकाळी सुरू असलेल्या शोधकार्यातून बाहेर काढले. सर्वात शेवटी अथक प्रयत्नानंतर संचिताला या ढिगार्‍याखालून काढण्यात आले.