वासिंद-कांबारे रस्त्याची दुरावस्था

Mumbai

वसिंद कांबारे पिवळी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था निर्माण झाली असून या रस्ताचे काम संबंधित कंत्राटदार एजन्सीकडून रखडवून ठेवले आहे. रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात न केल्यामुळे रस्ता खड्डयांच्या विळख्यात सापडला आहे. येत्या आठवड्याभरात रस्त्याचे काम त्वरीत सुरु न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दहागाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख श्याम धानके यांनी दिला आहे.

शहापुर तालुक्यातील वासिंद-कांबारे हा प्रमुख जिल्हा मार्ग वाडा, पालघर, गुजरात, ठाणे, मुंबई साठी सोईस्कर रस्ता ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन रस्त्याच्या आसपास गावांसह या लांब वाहतूक करणार्‍या वाहनांची सततची रहदारी सुरु असते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली अँन्युटी हायब्रीड उपक्रम अंतर्गत रस्ता दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी आनिस इन्फ्राकॉम व मिलन असोसिएट या एजन्सीद्वारे काम हाती घेण्यात आले. मात्र पावसाळा संपूनही अद्यापही या कामाला सुरुवात केली नसल्याचे दिसून येते.

त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यात टाकलेली मोठी खडी तसेच काही ठिकाणी अरूंद रस्ता, यामुळे अपघात घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ये-जा करणार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अद्यापही या कामांकडे दुर्लक्ष केलेल्या या एजन्सीचा ठेका रद्द करावा अन्यथा येत्या आठ दिवसांत काम त्वरीत सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे शाखा प्रमुख श्याम धानके यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here