घरमुंबईवरळीच्या लव्हग्रुव्ह नाल्यावरच तरंगता कचरा रोखणार

वरळीच्या लव्हग्रुव्ह नाल्यावरच तरंगता कचरा रोखणार

Subscribe

महापालिका यांत्रिक स्क्रीन बसवणार

पावसाळ्यात मुंबईतील शहर भागांमध्ये तुंबणार्‍या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशनमध्ये कचरा अडकून पंप बंद पडण्याचा घटना टाळण्यासाठी आता त्याठिकाणी यांत्रिकी स्क्रीन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या स्क्रीन प्रणालीमुळे पंपिंग स्टेशनमध्ये जाण्यापूर्वीच सर्व तरंगता आणि जड वजनाचा कचरा या यांत्रिकी स्क्रीनच्या जागी अडकला जाईल. ज्यामुळे तरंगता व जड कचरा आधीच यांत्रिक पध्दतीने उचलून त्यांची विल्हेवाट लावली जाईल.परिणामी कचर्‍यामुळे पंप बंद होण्याच्या प्रकाराला आळा बसेल. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या स्क्रीन बसवण्याचा आणि पुरवण्याचा कोणताही अनुभव नसताना महापालिकेने बिगरअनुभवी कंत्राटदाराची नेमणूक केल्याने शंका उपस्थित केली जाते.

मुंबईत पावसाळ्यातील पूरपरिस्थितीला आळा घालण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातंर्गत हाजी अली, इर्ला, लव्हग्रुव्ह, क्लिव्हलँड बंद आणि ब्रिटानिया आऊटफॉल आदी ठिकाणी पाच पंपिंग स्टेशनची उभारणी केली. तर यंदाच्या पावसाळ्यापासून गझधरबंद पंपिंग स्टेशन कार्यान्वित होत आहे. हाजीअली, क्लिव्हलँड आणि ब्रिटानिया आऊटफॉल आदी पंपिंग स्टेशनमध्ये बंदिस्त नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून येत असते. त्यातुलनेत इर्ला व लव्हग्रुव्ह या पंपिंग स्टेशनमध्ये भूमिगत बरोबरच उघड्या नाल्यांमधून पावसाचे पाणी येते. परंतु पावसाच्या पाण्याच्या प्रवाहातून येणारा तरंगता कचरा तसेच पाण्यातून वाहून येणार्‍या गाद्या, तुटलेल्या फर्निचरचे तुकडे, आदी जड वजनाचा कचरा पंपिंग स्टेशनमधील स्क्रीनमध्ये जावून बर्‍याचदा पंपिंग स्टेशन बंद पडते.

- Advertisement -

लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशनच्याठिकाणी भरती आणि ओहोटीच्या स्थितीनुसार पुराचे गेट उघडले जातात किंवा बंद केले जातात. सध्या लव्हग्रुव्ह नाला येथे असलेल्या स्क्रीनवरील आणि लव्हग्रुव्ह उदंचन केंद्राच्या पुर गेटवर साचलेल्या तरंगत्या वस्तू तेथे असलेल्या ग्रॅब क्रेनच्या सहाय्याने पूर्णपणे काढता येत नाही ही समस्या सोडवण्यासाठी पूर्ण नाल्यावर तिथे एखादी यांत्रिकी स्क्रीन प्रणाली बसवणे आवश्यक होते. त्यामुळे पर्जन्य जलविभागाने याचा सर्वे व अभ्यास केल्यानंतर यावर उपाय म्हणून हेवी ड्युटी बॅक रेक प्रकारची यांत्रिकी स्क्रीन सिस्टीम अस्तित्वात असल्याने याबाबतची प्रणाली बसण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याची संरचना, फॅब्रिकेशन, पुरवठा, स्थापना आणि चाचणी करून कार्यान्वित करणे व पुढील पाच वर्षांचे देखभाल यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील ९ महिन्यांमध्ये ही प्रणाली सुुरु होणार असून यासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापूर्वी लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशनमध्ये जेटीचा तुटलेला दगड पाण्याबरोबरच वाहून येवून स्क्रिनमध्ये अडकल्याने ते बंद पडण्याचे प्रकार घडले होते.

लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशनला येणारे पाणी
पठ्ठे बापुराव मार्ग, एस.व्ही.पी रोड, मौलाना आझाद रोड, काळबादेवी रोड, ताडदेव रोड, केशवराव खाडे मार्ग, सानेगुरुजी मार्ग, रेसकोर्स, अ‍ॅनी बेझंट रोड, डॉ. ई मोझेस रोड, गणपतराव कदम मार्ग, करी रोड रेल्वे स्टेशनमार्ग,, एन.एम.जोशी मार्ग, सखाराम मोहिते मार्ग आणि जे.एम.भरुचा मार्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -