घरमुंबईपाणीकपातीच्या मुद्यावर राजकारण तापणार

पाणीकपातीच्या मुद्यावर राजकारण तापणार

Subscribe

पाणीकपातीच्या मुद्यावरून बदलापुरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्यावर होर्डिंग्जच्या माध्यमातून भाजपला तसेच नामोल्लेख न करता स्थानिक आमदार किसन कथोरे यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली आहे. आगामी काळात या मुद्यांवर राष्ट्रवादी अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेतही राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिले आहेत.

बदलापूर तसेच अंबरनाथ शहराचा काही भाग आणि ऑर्डनन्स फॅक्टरीला पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून दिवसाआड पाणीकपात करण्याचा निर्णय डिसेंबर अखेरीस जाहीर केला होता. मात्र त्यानंतर हा निर्णय बदलून आठवड्यातून सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आठवड्यात दिवसाआड पाणीपुरवठा करणे काय किंवा सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे काय, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्यामुळे त्यातून नागरिकांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार हे स्पष्टच आहे. असे असताना निर्णय बदलून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काय साधले?, असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीकपातीच्या मुद्यावर राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीने होर्डिंग्जच्या माध्यमातून पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली होती. या होर्डिंग्जमध्ये भाजपला तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांना नामोल्लेख न करता टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवार, ९ जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय गाठून पाणी कपात रद्द करण्यात यावी, शहरात होत असलेली ३२ टक्के पाणीगळती थांबवून पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. पाणीकपात रद्द करण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास आगामी काळात राष्ट्रवादी या मुद्यावर आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचेही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पाणीकपातीला आमदारांचाही विरोध
२१ ऑक्टोबरपासून आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी ६ तास पाणीपुरवठा बंद ठेवला तरी ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. असे असताना दिवसाआड पाणीपुरवठा बंद करण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून आमदार किसन कथोरे यांनी दिवसाआड पाणीकपातीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. नागरिकांची गैरसोय होणार असल्याने आठवड्यातून सलग तीन दिवस पाणीकपात करण्याच्या निर्णयालाही आपला विरोध असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -