घरमुंबई२७ गावातील पाण्याचा प्रश्न २ वर्षांत सुटणार; पालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन

२७ गावातील पाण्याचा प्रश्न २ वर्षांत सुटणार; पालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे २७ गावांसाठी १९४ कोटी रुपयांचा निधी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी लागणाऱ्या जागा आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसमवेत गावांमध्ये जाऊन कामाचा आढावा घेतला आहे. येत्या दोन वर्षांत २७ गावांमध्ये ही योजना कार्यन्वित करणार असल्याचे आश्वासन केडीएमसीचे अभियंता राजीव पाठक यांनी दिले. या योजनेनंतर २७ गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत १९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी गावांमध्ये तब्बल २८ पाण्याच्या टाक्या आणि १४ सम्प टाक्या उभारल्या जाणार आहेत. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्या समवेत आमदारांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यासाठी लागणाऱ्या जागांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी, खाजगी विकासक, जागामालक यांचा आमदार पाटील यांनी समन्वय घालून दिला आहे. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी इतर समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले जाईल असे सांगितले आहे. तर खाजगी विकासक, जागा मालकांनी देखील योग्य सहकार्य केडीएमसी अधिकाऱ्यांना केले जाईल असे पाटील यांना सांगितले.

- Advertisement -

कल्याण ग्रामीण मधील आजदे, सोनारपाडा, डोंबिवली एमआयडीसी, भोपर-देसलेपाडा, उसरघर, कोळे आणि कटाई या गावांमध्ये जागेची पाहणी करत योजनेचा आढावा घेतला आहे. तर उर्वरीत गावांमध्ये पाहणी दौरा देखील लवकरच केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षांत २७ गावांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार असून कल्याण डोंबिवली मधील २७ गावांना या योजनेअंतर्गत १०५ एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे २७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, असे केडीएमसीचे अभियंता राजू पाठक आणि विजय पाटील यांनी सांगितले. तर जोपर्यंत ही योजना पूर्णपणे कार्यन्वित होत नाही तोपर्यंत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करता येईल का? याचा सुद्धा आढावा घेतला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -