आम्ही कंगनाच्या पाठीशी आहोत – रामदास आठवले

ramdas athavle meets kangana ranaut

कंगना रानौतला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे ही त्यांचीही भावना आहे. आमचीही हीच भावना आहे. मुंबई ही आरपीआयची आहे, भाजपची, राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेसची, शिवसेनेची सगळ्यांची आहे. मुंबईत राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कंगना रानौतवर अन्याय झाला आहे. तिला न्याय मिळवून देणार, असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे. कंगनासोबत मी एक तास चर्चा केली. त्यांनी काय काय घडले ते सगळे सांगितले. कंगनाने कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. आम्ही कंगनाच्या पाठीशी आहोत, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. कंगना रानौतच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

कंगनासोबत मी एक तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, माझ्यावर अन्याय झाला आहे. माझे ऑफिस पाडण्यात आले. ऑफिसमधल्या फर्निचरची तोडफोड केली आहे. याप्रकरणी मी कोर्टात जाणार आहे. मला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे तिने मला सांगितले आहे. एक चांगले ऑफिस मी केले होते ते तोडण्यात आले. केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री कंगना रानौतची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कंगना कोणतीही जाती व्यवस्था मानत नसल्याचेही तिने मला सांगितले. एवढेच नाही तर कंगना रानौतच्या कार्यालयावर जी कारवाई झाली ती सूड भावनेने करण्यात आली. सिनेमातून मिळणार्‍या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून तिने ऑफिस बांधले होते. त्यातला काही भाग अनधिकृत होता तर मग त्यासाठी आधी नोटीस का बजावण्यात आली नाही? असाही प्रश्न रामदास आठवलेंनी उपस्थित केला.

कंगना रानौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकार्‍यांनी कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. कंगनाने त्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो योग्यच आहे. या प्रकरणी कोर्ट योग्य तो निर्णय देईलच. कंगनाला मुंबईत घाबरण्याची काहीही गरज नाही. मुंबई सगळ्यांची आहे. आपण मुंबईकरच असल्याचेही कंगनाने मला सांगितले आहे. आमचा कंगनाला पूर्णपणे पाठिंबा आहे, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉरही रंगले होते.