घरमुंबईआपण एका वर्गात शिकत होतो...

आपण एका वर्गात शिकत होतो…

Subscribe

मागील काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरच्या अंधेरी रेल्वे स्थानकात एका माथेफिरु तरुणाने उच्छाद मांडला आहे. या तरुणाकडून अनेक तरुणींचा विनयभंग केल्याच्या तक्रारी अंधेरी लोहमार्ग पोलिसांकडे आल्या आहेत. पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला आहे. आपण एकाच वर्गात शिकत होतो, असे बोलून हा तरुण महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

एका तरुणाने लगट करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी एका तरुणीने अंधेरी लोहमार्ग पोलिसांकडे केली होती. सुरुवातीला तो तिचा वर्गमित्र आहे असे भासवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याने तिने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. मात्र काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येताच तिने त्याला हटकले आणि रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. ही तरुणी तक्रार करण्यासाठी रेल्वे पोलिसांकडे गेली असता अशाप्रकारच्या आणखी काही तक्रारी आधीच पोलिसांकडे आल्याने पोलीसदेखील चक्रावले. सगळ्या तक्रारींमध्ये सारखेपणा असल्याने हा माथेफिरु एकच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या घटनेनंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी माथेफिरु तरुणाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महिला किंवा तरुणींनी बोलण्यासाठी आरोपी आपण एकाच वर्गात शिकत होतो, असे कारण सांगून बोलण्याचा प्रयत्न करतो. एकदा का बोलणं झालं की मग फोन नंबर देण्यासाठी सांगतो. मग जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग करतो.

- Advertisement -

स्केचच्या आधारे फेसबुक प्रोफाईल शोधले
आरोपी वारंवार महिलांना त्रास देत असल्याने एका महिलेने केलेल्या वर्णनानुसार त्याचे रेखाचित्र बनवण्यात आले. पोलिसांनी या तरुणाचे फेसबूक प्रोफाईल शोधून काढले आहे. लवकरच त्याला अटक होईल.
-प्रमोद बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -