अयोध्येला जेव्हा जाग येते!

शिवसेनेमुळे 1992 नंतर प्रथमच अयोध्या नगरी जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमली

Mumbai

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळे 1992 साली सर्व देश जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमला होता. तेच वातावरण आता 25 वर्षांनंतर श्रीरामाच्या जन्मभूमीत अयोध्येत दिसून आले. शिवनेरीहून आणलेल्या मातीचे अयोध्येत पूजन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीच्या किनार्‍यावर जाऊन शनिवारी संध्याकाळी महाआरती केली. तेव्हा महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शिवसैनिकांबरोबर अयोध्यावासीय मोठ्या संख्येने आरतीत सहभागी झाले होते. एकूणच शिवसेनेमुळे अडीच दशकात अयोध्या भगवेमय झाल्याचे चित्र जागोजागी दिसले!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जादू आजही भारतभर आहे. २५ वर्षांपूर्वी अयोध्येतील बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असे सांगणार्‍या बाळासाहेब यांचा पुत्र अयोध्येत येणार असल्याने गेले महिनाभर येथील वातावरणात प्रचंड उत्सुकता होती.

शनिवारी उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच ही उत्सुकता शिगेला पोहचलेली दिसली. शिवसैनिकांची गर्दी, सर्वत्र भगवे झेंडे आणि श्रीरामाची मोठी चित्रे यांनी वातावरणात भगवेमय झाले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेल्या मोठमोठ्या पोस्टरवर ‘हर हिंदू की पुकार, पहिले मंदिर, फिर सरकार’, असा थेट नरेंद्र मोदी सरकारला दिलेला इशारा अयोध्यावासीयांच्या गेली 25 वर्षे दबून राहिलेल्या भावभावनांना उसळी देणारा होता.

शिवसेना पक्षात चैतन्य

कुठल्याही पक्षाला एका ठराविक अंतरानंतर एक मोठा कार्यक्रम लागतो. तो कसा असावा, त्याने समाजमनावर काय परिणाम होईल, हा भाग अलाहिदा असला तरी मुळात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तो मोठा उत्साह वाढवणारा भाग असतो. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांच्या तोंडावर शिवसैनिकांना ‘चलो अयोध्या’ हा कार्यक्रम देऊन अचूक वेळ साधली आहे. विशेष म्हणजे सर्व प्रमुख नेत्यांना, खासदार आणि आमदारांना एका छताखाली आणत एक प्रकारे आता निवडणुकांच्या कामाला लागा, असे न बोलता इशाराही ठाकरे यांनी दिला.

ठाकरे कुटुंबिय मैदानात उतरले आणि…

उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरले होते. पण शनिवारी सकाळी उद्धव यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा अयोध्येत आल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ठाकरे परिवार सहसा महाराष्ट्राबाहेर जात नाही. हा समज उद्धव यांनी खोडून काढला. सेनापती आपल्या परिवारासह मैदानात उतरल्याने सैनिकांमध्ये आपले सर्वस्व देण्याची भावना निर्माण होते, तेच चित्र अयोध्येत दिसले. शिवसैनिकांशी बोलताना उद्धव यांच्यासाठी काय पण करण्याची आपली तयारी असल्याचे ते मोठ्या जोशात सांगत होते.

संजय राऊत, एकनाथ शिंदे ठरले प्रमुख

दसरा मेळाव्यापूर्वी अयोध्या दौरा ठरवण्यात आला. मेळाव्यात त्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत दौर्‍याच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत होते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही राऊत यांच्याबरोबर होते. या दोन्ही प्रमुख सल्लागारांच्या जोडीला शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताकदीची निर्णायक क्षणी जोड देण्यात आल्याने अयोध्या दौर्‍याला जिवंतपणा आल्याचे दिसून आले. ठाण्याहून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने अयोध्येत उतरले होते आणि त्यांनी हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. शरयू नदीच्या काठी आरती करताना उद्धव यांच्या बाजूला एकनाथ शिंदे आणि आदित्य यांच्या शेजारी संजय राऊत उभे होते. सुरुवातीला आपण आरती केल्यानंतर उद्धव यांनी राऊत आणि शिंदे यांच्यासह आपल्या सर्व प्रमुख नेत्यांच्या हाती आरती सोपवत शिवसेना पक्षप्रमुख आणि नेते यांच्यातील संवादाचा सूर एक तालात असल्याचे दाखवून दिले.

सुरक्षा व्यवस्थेमुळे छावणीचे स्वरुप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे अयोध्येत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून सुरक्षा छावणीचे स्वरुप अयोध्येला आले आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच ड्रोन कॅमेर्‍यातूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. राम जन्मभूमीच्या ठिकाणी चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा होता. तर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पूर्ण अयोध्या शहरात शिवसेनेची होर्डिंग आणि लागलेल्या झेंड्यामुळे परिसर भगवामय झाल्याचा दिसत आहे.

मुंबईकर उत्तर भारतीयांचा पाठिंबा

उद्धव ठाकरे यांच्या मिशन अयोध्या कार्यक्रमाला मुंबईकर उत्तर भारतीयांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हुरूप होता. राज्यभरातील विविध भागातून शिवसैनिक अयोध्येला आले आहेत. पुण्यातील काही शिवसैनिक दुचाकीने, तर नाशकातील शिवसैनिक विशेष ट्रेनने अयोध्येला पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील वारकरीही अयोध्येत

आषाढी-कार्तिकीला पंढरीची वाट धरणारे वारकरी राम जन्मभूमी अयोध्येला आले आहेत. शिवसैनिकांच्या जय श्रीराम एक्स्प्रेसमध्ये काही वारकरीही सहभागी झाले होते. अयोध्येत रामाचं भव्य मंदिर उभं रहावं, अशी त्यांचीही मागणी आहे. वारकरी अयोध्येत रामकृष्ण हरीचा जयघोष करत होते.

शरयूवर भक्तीमय वातावरण

उद्धव ठाकरे यांनी शरयू तीरावर पारंपरिक पद्धतीने महाआरती केली. याचवेळी शरयू तीरावर नदीत दिवे सोडण्यात आले. यामुळे दिवाळीसदृश्य वातावरण तयार झाले होते. या कार्यक्रमाआधी लक्ष्मण घाटावर संत, महंतांच्या उपस्थित उद्धव ठाकरे यांनी महासभा घेतली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने शिवसैनिकांचा उत्साह दुणावला होता.

मुंबई, ठाण्यातही महाआरतीचे आयोजन

अयोध्येत शरयू नदीच्या काठी उद्धव ठाकरे ज्यावेळी आरती करत होते. त्याचवेळी मुंबई आणि ठाणे रायगडसह राज्यभरात ठिकठिकाणी महाआरत्यांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर खासदार विनायक राऊत, मंत्री दिवाकर रावते, आमदार सदा सरवणकर आणि सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते, मुंबईप्रमाणे जांभळी नाका येथे आरती करण्यात आली. महाआरत्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जाम झाले होते.

राम मंदिराची तारीख आता सांगावीच लागेल उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला इशारा

अयोध्या अयोध्येत का येत आहात, असे मला अनेकांनी विचारले? यामध्ये काय राजकारण आहे का? मात्र, यामध्ये मी कोणतेही राजकारण करणार नाही. माझे एवढेच म्हणणे आहे की आता राम मंदिराची तारीख नरेंद्र मोदी सरकारला सांगावीच लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. राम दर्शनासाठी अयोध्येमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण किल्ल्यावरून आशीर्वाद सभेदरम्यान जनसंवाद केला.

आता हिंदूंची आणखी परीक्षा बघू नका. ‘हर हिंदू की यही पुकार, पहिले राम मंदिर, फिर सरकार’. त्यामुळे राम मंदिर हे झालेच पाहिजे. मी कोणत्याही राजकारणासाठी अयोध्येत आलो नाही, तर राम दर्शनासाठी अयोध्येत आलो आहे. कुंभकर्णीरूपी सरकारला जागे करण्यासाठी येेथे येण्याचा माझा उद्देश होता, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सरकारनं राम मंदिरासाठी कायदा केल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देईल. झोपलेल्या कुंभकर्णाला मी जागं करायला आलो आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला लक्ष्य केले.

राम मंदिरासाठी किती वर्ष वाट पाहायची? असा सवालही त्यांनी केला आहे. राम मंदिर केव्हा बांधणार याची तारीख सांगा असे म्हणत त्यांनी भाजपला 2014 साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. 1992 साली हिंदू मार नही खायेगा, असा इशारा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी अब हिंदू चूप नही बैठेगा, असे म्हटले आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, श्रीरामांचे मंदिर व्हायलाच हवे. अध्यादेश आणायचा असेल तर सरकारने तो आणावा. राम मंदिरासाठी कायदा आणत असाल तर तेही सांगावे. नोटांबदीचा निर्णय घेतला त्याप्रमाणे हा देखील निर्णय घ्यावा. तुम्ही विसरलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी आज मी येथे आलोय, याकडे उद्धव यांनी लक्ष वेधले. मंदिर बनविण्यासाठी हिंमत लागते. छाती कितीही मोठी असली तरी मर्दासारखे हृदय असणे गरजेचे आहे, असा टोला त्यांनी मोदी यांना लगावला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here