घरमुंबईमहापालिकेतील पहारेकरी दृष्टिहीन!

महापालिकेतील पहारेकरी दृष्टिहीन!

Subscribe

महापालिकेचे भाजप गटनेते असलेले मनोज कोटक खासदार झाल्यानंतर महापालिकेतील भाजप पक्ष दृष्टिहीन बनला आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्ता भोगणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांची भूमिका बाजावण्याचा निर्णय घेतला. परंतु महापालिकेचे भाजप गटनेते असलेले मनोज कोटक खासदार झाल्यानंतर आणि युती मोट पुन्हा घट्ट बांधल्यानंतर महापालिकेतील भाजप पक्ष दृष्टिहीन बनला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहारेकऱ्यांनी हातातील दांडू बाजूला ठेवला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर भाजपाला दृष्टी देणाऱ्या गटनेत्यांची निवड होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेचे भाजप गटनेते मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून पक्षाने उमेदवारी दिली. पक्षाने दिलेली उमेदवारी आणि टाकलेला विश्वास सार्थ ठरवत कोटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. मात्र, खासदार झाल्यावर कोटक यांचे पाय महापालिकेला लागलेले नाही. लोकसभा उमेदवारी झाल्यापासून कोटक हे एकदाच महापालिका मुख्यालयात आले असून गटनेताअभावी पक्षाचे धोरण राबवण्यात महापालिकेतील भाजपचे नेते तथा नगरसेवक कमी पडताना दिसत आहेत.

- Advertisement -

कोटक खासदार बनल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी आमदार अतुल शाह, अभिजित सामंत, माजी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, उज्वला मोडक, दक्षा पटेल आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन दोन महिने उलटत आले तरीही भाजपच्या महापालिका गटनेत्याची निवड नाही. त्यामुळे स्थायी समिती, सुधार समिती तथा गटनेत्यांच्या सभेत भाजपची भूमिका मांडली जात नाही.

आयुक्तांनी, गटनेत्यांच्या सभेपुढे खासगी सहभाग तत्वातून उभारण्यात आलेल्या २९ वाहनातळ आसपास ५०० मीटर परिसरात अनधिकृत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण मांडले आणि महापौरांनी ते मंजूर करताच त्याची त्वरित अंमलबजावणी केली. विधी समिती आणि सभागृहापुढे ना मांडता याची अंमलबजावणी करत आयुक्तांनी सभागृहाचा अवमान केला. परंतु नेहमी कंत्राट कामाच्या प्रस्तावावर कायद्याचा किस पडणारे प्रभाकर शिंदे यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. तसेच मालाड भिंत प्रकरण, गटार व नाल्यात बुडून झालेले मृत्यू तसेच इमारत दुर्घटना आदींबाबाबतही भाजप नेत्यांची चुप्पी आहे. त्यामुळे कोटक खासदार बनल्यानंतर भाजप महापालिकेत लंगडे पडताना दिसत आहे. त्यामुळे इच्छूकांपैकी कुणाच्या डोक्यावर कुंकवाचा टिळा लावून त्यांना खुर्चीवर बसवावे लागणार आहे. परंतु आजवर प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्ष यांची निवड न झाल्याने ही निवड रखडली होती. पण आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची निवड केल्यामुळे दृष्टिहीन बनलेल्या भाजपला महापालिकेत दृष्टी देणारा नेता आता तरी निवडला जाणार का, असा सवाल केला जात आहे. मंगल प्रभात लोढा यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या विश्वासातील अतुल शाह यांची निवड होते की अन्य कुणाची निवड लोढा करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -