घरमुंबईएमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीत ४५० कोटींचे रस्ते बांधणार

एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीत ४५० कोटींचे रस्ते बांधणार

Subscribe

डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ४५० कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येईल, अशी माहिती दिली.

एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ४५० कोटींचे रस्ते उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये काही प्रमुख तर काही अंतर्गत असे मिळून ३४ रस्त्यांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या कामकाजावर ताशेरे ओढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीला मान्यता दिली असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या ३४ रस्त्यांपैकी ४ रस्त्यांचा खर्च हा ५ कोटींच्या आत असल्याने त्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत केले जाणार आहे. तर उर्वरीत ४५६ कोटी रुपये खर्चाचे ३० रस्ते एमएमआरडीए प्रशासन बनवणार आहे. त्यातही ६ रस्ते डोंबिवली पश्चिमेतील तर उर्वरित २४ रस्ते डोंबिवली पूर्वेतील आहेत. येणाऱ्या काळात डोंबिवलीकरांना थोडा त्रास सहन करावा लागेल. मात्र त्यानंतर सर्व रस्ते चांगले झालेले असतील, असा विश्वासही राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनावर हल्लाबोल

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनातील अधिकारी वर्ग अत्यंत ढिम्मपणे काम करत असून त्यामुळे शहरांच्या विकासाला खीळ बसल्याचा हल्लाबोल राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केला. लोकप्रतिनिधींनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या कामांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत. याला प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त आणि त्यांचे अधिकारी जबाबदार असल्याची टीका सुद्धा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -