‘भाजपसोबतचा निर्णय येत्या १० दिवसांत घेईन’

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Mumbai
Narayan rane talks about loksabha elections in Aurangabad
नारायण राणे

भाजपने नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी तर दिली. पण अद्याप नारायण राणे यांचा भाजपमधील अधिकृत प्रवेश रखडला आहे. यावर भाजप प्रवेशाबाबत नारायण राणे यांनी खुलासा केला आहे. येणाऱ्या दहा दिवसांत भाजपबरोबर जायचे की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा, असे सूचक व्यक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या चार ते पाच दिवसांत यासंबंधी मला सांगतील. त्यामुळे येणाऱ्या १० दिवसात भाजप बाबतचा निर्णय स्पष्ट होईल, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे. दरम्यान नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचरित्रात शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चिठ्ठीद्वारे घेतला होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सांगितले होते.

भाजप प्रवेशाबाबत काय म्हणाले नारायण राणे?

”येणाऱ्या १० दिवसात भाजपबाबत निर्णय घेईन. या १० दिवसांनंतर भाजपत असेन की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी चित्र स्पष्ट होईल,” असे नारायण राणे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ”भाजपने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत, ज्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला याबाबत सांगतील. त्यानंतर मी माझा निर्णय घेईन,” असे सांगत, ”प्रतिक्षेलासुद्धा मर्यादा असतात”, असे बोलून नारायण राणे यांनी रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येणाऱ्या काळात नारायण राणे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ‘आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण प्रविण चौगुलेच्या स्वामी निष्ठेला सलाम’

काँग्रेस प्रवेशाबाबत चिठ्ठी टाकून निर्णय

काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचित्राचे प्रकाशन पार पडले. यावेळी नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची कार्यक्रमाला उपस्थित राजकारण्यांनी आठवण काढली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला होता. यावेळी नारायण राणे यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या होत्या. एका चिठ्ठीत काँग्रेसचे तर दुसऱ्या चिठ्ठीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव होते. त्यांनी उचललेल्या चिठ्ठीत काँग्रेसचे नाव होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रात लिहिले असल्याचेसुद्धा शरद पवार यांनी सांगितले.