घरमुंबई१८ लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक

१८ लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक

Subscribe

माहीम येथून १८ लाखांच्या ड्रग्जसह एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. वरळी युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. निलोफर हफीज शेख असे या ४४ वर्षीय महिलेचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी एमडीसह हेरॉईनचा साठा जप्त केला असून ती ड्रग्ज वितरीत करणारी एक प्रमुख वितरक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने हजर केले असता कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी केली कारवाई 

माहीम परिसरात काहीजण मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील मराठे, चव्हाण आणि इतर पथकाने जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील माहीम फिशरमन कॉलनी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे एक महिला संशयास्पदरीत्या फिरत होती. तिची संशयास्पद हालचाल वाटताच तिला या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिची अंगझडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना १२ लाख २४ हजार रुपयांचे ३०६ ग्रॅम वजनाचे एमडी आणि ५ लाख ९० हजार रुपयांचे ५९ ग्रॅम वजनाचे हेरॉईन असा तब्बल १८ लाख १४ हजार रुपयांचा ड्रग्जचा साठा त्यांनी जप्त केला.

- Advertisement -

५ वर्षापासून ड्रग्ज विक्री करते

दरम्यान, चौकशीत निलोफर ही वांद्रे येथील एस. व्ही रोडवरील जामा मशिदीजवळील मौलाना बाबा दर्गा लेन परिसरात तिच्या मुलांसोबत राहते. गरीबीमुळे ती या क्षेत्रात आली होती. गेल्या चार ते पाच वर्षापासून ती ड्रग्ज विक्री करत होती. यापूर्वी तिला ड्रग्ज विक्रीप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. मात्र नंतर तिला जामीन मिळाला होता. गेल्या काही वर्षात ती ड्रग्ज विकणारी प्रमुख वितरकापैकी एक झाली होती. तिच्याकडे सर्व प्रकारचे ड्रग्ज मिळतात. त्यामुळे तिच्याकडून मोठ्या प्रमाणात काही तरुण ड्रग्ज खरेदी करत होते. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

घाटकोपरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

दरम्यान, अशाच एका कारवाईमध्ये एका ड्रग्ज तस्कराला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या जावेद वाहिदअली सय्यद या २९ वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ५५ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची किंमत २ लाख २५ हजार ऐवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जावेद हा पवईतील मोरारजी नगर, जय भीमनगरातील शिवशी चाळीचा रहिवाशी आहे. मंगळवारी तो विक्रोळी येथील एलबीएस मार्गावरील महेंद्र शोरुमजवळ एमडी विक्रीसाठी आला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत ड्रग्ज जप्त केले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -