घरमुंबईअत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची बाळासमोर निर्घृण हत्या

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची बाळासमोर निर्घृण हत्या

Subscribe

भिवंडीमध्ये शेजार राहणारी भाडेकरू महिला घरात एकटी असल्याची संधी साधून नराधम तरुणाने घरात शिरून महिलेवर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने अत्याचाराला प्रतिकार केल्याच्या रागातून नराधमाने भाजी चिरण्याच्या धारदार चाकूने सपासप वार करून महिलेची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भिवंडीच्या राहनाळ येथे घडली. चिंतादेवी रमेश यादव (२३ वर्ष) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

अशी घडली घटना

सदर महिलेचा पती गोडाऊनमध्ये कामावर गेला होता. ती पती कामावरून येण्याची वाट पाहत आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह घरात एकटीच होती. त्यावेळी शेजारी राहणारा नराधम निखील संजय कडू (२० वर्ष) हा दारूच्या नशेत घरात शिरला आणि तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी महिलेने त्या नराधमाला जोरदार प्रतिकार केल्याने नराधमाचा राग अनावर झाला. त्या रागातून त्याने धारदार चाकूने चिंतादेवी हिच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर सपासप सात वार केले. यामध्ये पाठीमागून केलेला चाकूचा वार थेट फुफ्फुसाला घुसल्याने ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

आरोपीला अटक

त्यानंतर काही वेळाने तिचा पती रमेश यादव हा कामावरून घरी आल्यावर सदरची घटना समोर आली. त्याने या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या हत्येचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरु केला. यावेळी पोलिसांनी आजुबाजूच्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची हत्या शेजारी राहणारा निखील कडू याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करीत आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

अपमानास्पद वागणुकीला कंटाळून सूनेने केली सासूची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -