घरमुंबईWedding Website : विवाह संकेतस्थळावर महिलेला भामट्यानं फसवलं!

Wedding Website : विवाह संकेतस्थळावर महिलेला भामट्यानं फसवलं!

Subscribe

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना बाहेरची सगळी कामं थांबलेलं असताना ऑनलाईन असणाऱ्या सर्व गोष्टी जोरात होत्या. यामध्ये ऑनलाईन खरेदी-विक्रीपासून ऑनलाईन पैसे चुकते करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेळ होता. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये इतर ऑनलाईन विक्री संकेतस्थळांसोबतच विवाहविषयक संकेतस्थळांचा देखील समावेश आहे. नुकताच असाच एक प्रकार समोर आला असून अशाच एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ठाण्यातील एका ३६ वर्षीय विवाहेच्छुक महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलीस तपास करत आहेत.

नक्की काय घडलं?

ठाण्यात राहणारी ३६ वर्षीय अपंग पीडिता आपल्यासाठी पती शोधण्यासाठी विवाह संकेतस्थळावर योग्य वर शोधत होती. यादरम्यान तिची या संकेतस्थळावरच्या एका इसमाशी ओळख झाली. दोघांनीही विवाहेच्छुक असल्याचं सांगितल्यानंतर जुजबी ओळख झाल्यावर आपापले मोबाईल क्रमांक एकमेकांशी शेअर केले. फोनवर प्रत्यक्ष बोलताना या भामट्याने महिलेवर प्रभाव पाडण्यासाठी इंग्रजीतून संभाषण सुरू केलं. पण आपल्याला संभाषणातलं फारसं काही कळत नाही, असं म्हणत महिलेने फोन कट केला. त्यावर या भामट्याने व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केलं.

- Advertisement -

मी पाठवलेलं गिफ्ट तरी घे…

व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना या इसमानं ‘तू मला आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे’, अशी मागणी केली. पण ‘इतक्या लांब राहणाऱ्या व्यक्तीशी मला विवाह करायचा नाही’, असा स्पष्ट नकार या महिलेने दिला. मात्र, तरीदेखील हा भामटा चॅटिंग करतच होता. शेवटी, ‘माझ्याशी विवाह करू नकोस, पण किमान मी पाठवलेलं गिफ्ट तरी घे’, अशी गळ या इसमाने महिलेला घातली. याला महिलेने होकार दिला.

..आणि महिलेने ७ लाख भरले!

या संभाषणानंतर काही वेळातच महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेने फोन केला. ‘तुमचं गिफ्ट आमच्याकडे आलेलं आहे. ते घेऊन जाण्यासाठी ‘पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेमध्ये ठराविक रक्कम जमा करावी लागेल’, असं फोनवरील महिलेने पीडितेला सांगितलं. या चर्चेत गुंतलेल्या पीडितेने सांगितलेल्या खात्यांमध्ये दोन्ही बँकांचे मिळून ७ लाख रुपये भरले. मात्र, त्यानंतर १५ दिवस उलटूनही महिलेला गिफ्ट आलं नाही.

- Advertisement -

अखेर आपली फसवणूक झाल्याचं कळताच या महिलेने उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. या अनोळखी भामट्यासह त्याच्या महिला साथिदाराविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याचा शोध घेत असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -