घरताज्या घडामोडीबापरे! केंद्राकडून एका कोरोनाबाधित रुग्णामागे मिळतायत दीड लाख रुपये? जाणून घ्या सत्य

बापरे! केंद्राकडून एका कोरोनाबाधित रुग्णामागे मिळतायत दीड लाख रुपये? जाणून घ्या सत्य

Subscribe

केंद्र शासनाने प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर दीड लाख रुपये जाहीर केल्यामुळे राज्यात सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण मिळून येत असल्याची ऑडिओ क्लिप अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल केली. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या असणाऱ्या महिलेला ठाणे ग्रामीणच्या नवघर पोलिसांनी अटक केली आहे. रंजू झा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती एका राजकीय पक्षाची कार्यकर्ता असून उत्तर भारतीय महिला विंगची उपसभापती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिरा-भाईंदर येथील अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप मागील काही आठवड्यापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती. आमदार गीता जैन यांचे छायाचित्र तसेच त्याची माहितीचा आधार घेऊन ही ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये कोरोना संदर्भात माहिती देण्यात आलेली असून, कोरोनाच्या नावाखाली महानगरपालिका, खासगी लॅब तसेच रुग्णालयात कशाप्रकारे लूट सुरू आहे, तसेच केंद्र शासनाकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमागे दीड लाख रुपये राज्य शासन तसेच महानगरपालिकेला मिळत असल्याची खोटी माहिती ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती.

- Advertisement -

ऑडिओ क्लिप मधला आवाज आमदार गीता जैन यांचा नसून त्यांनी अशी कुठलीही क्लिप तयार केलेली नसल्याची माहिती खुद्द जैन यांनी दिली होती. हा माझ्या बदनामीचा कट असल्याचे सांगत जैन यांनी याप्रकरणी मीरा रोड येथील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या तसेच उत्तर भारतीय महिला विंगच्या उपसभापती रंजू झा या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. रंजू झा या सध्या गोरेगाव येथे राहण्यास असून यापूर्वी त्या मिरा भाईंदर येथे राहण्यास होत्या अशी माहिती पाटील यांनी दिली. आमदार गीता जैन यांचा आवाजाचे डबिंग करून हा ऑडिओ तयार करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -