घरमुंबईपोलीस निरीक्षकाला धमकावून महिला पोलिसांना मारहाण

पोलीस निरीक्षकाला धमकावून महिला पोलिसांना मारहाण

Subscribe

आरोपी महिलेला दिल्लीतून अटक

आंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धमकावून पाच महिला पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या रेश्मा नरेंद्रकुमार मलिक या 40 वर्षांच्या आरोपी महिलेस बुधवारी सकाळी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच रेश्मा ही पळून गेली होती. अखेर तिला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर तिला येथील स्थानिक न्यायालयाने 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सावनी सुबोध शिगवन ही महिला पोलीस शिपाई सध्या आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. 8 डिसेंबरला त्या दिवसपाळीवर कर्तव्यावर हजर होत्या. दुपारी अडीच वाजता रेश्मा मलिक ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिथे पोलीस निरीक्षक सरगर, सावनी शिगवन आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई ज्योती पाडेकर या उपस्थित होत्या. गायकवाड यांनी तिची विचारणा केली असता तिने आपण एक लेखी तक्रार केली आहे, या तक्रारीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप करत त्यांच्यासमोरच तुम्ही सगळे चोर आहात, तुम्ही गुन्हेगारांना पाळता, तुमच्यामुळे माझी प्रकृती बिघडली आहे, असे बोलून तुम्हाला कोणालाही मी सोडणार नाही, अशी धमकी देऊ लागली. यावेळी भारत गायकवाड यांच्यासह इतर पोलिसांनी तिला शांत राहण्यास सांगितले. मात्र, तिने जोरजोरात पोलिसांवरच आरोप करून त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली. यावेळी रेश्मा आणि ज्योती यांनी तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी तिने ज्योती पाडेकर यांना जोरात लाथेने मारहाण केली तर रेश्मा यांच्या कानशिलात लगावली होती.

- Advertisement -

हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी तिने अन्य तीन पोलीस शिपाई फापाळे, वाघमारे आणि बच्छाव यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली होती. वाघमारे यांचे केस ओढले तर बच्छाव यांच्या पोटावर आणि पायाला जोरात लाथा मारल्या, तसेच त्यांच्या मदतीसाठी आलेल्या फापाळे यांना धक्काबुक्की केली होती. तिला सर्व पोलीस आवरण्याचा तसेच शांत राहण्याची विनंती करीत होते. मात्र, ती कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यावेळी तिने पुन्हा भारत गायकवाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा ताबा घेऊन तिला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तिथेही तिने डॉक्टरांसमोरच प्रचंड धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सावनी शिगवन यांच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी रेश्मा मलिकविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी मारामारी, शिवीगाळ करून धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

गुन्हा दाखल होताच रेश्मा मलिक ही पळून गेली होती. तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी पोलीस पथक गेले होते. यावेळी रेश्मा ही दिल्ली येथे गेल्याचे पोलिसांना समजले. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस हवालदार खैरे, महिला पोलीस शिपाई संकटी, धेंडे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्लीतील पार्लमेंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक रोडवरील साहिब गुरुद्वारा, बॅग्स बंगल्यातून रेश्माला सोमवारी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत संघर्षी हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -