घरमुंबईउपकरणे रेल्वे ट्रॅकवरच टाकून कामगारांचे पलायन

उपकरणे रेल्वे ट्रॅकवरच टाकून कामगारांचे पलायन

Subscribe

दिव्याजवळ लोकलचा मोठा अपघात टळला, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणा उघड
रेल्वे कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे रविवारी कल्याण आणि दिवा स्थानकांमध्ये एक मोठा अपघात घडला असता. पण सुदैवाने तसे घडले नाही. केवळ शॉर्टकट मारण्यासाठी रेल्वेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे पर्यवेक्षक आणि तीन कामगार आवश्यक साहित्य घेऊन पुलाऐवजी थेट रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याचवेळी कल्याणच्या दिशेने एक लोकल जात असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी घाबरून हातातील साहित्य तिथेच सोडून रूळ ओलांडले. लोखंडी रॉड आणि चेन रेल्वे ट्रॅकवर पडले असतानाच तिथून लोकल पुढे गेली. आणि मोटारमनने तात्काळ ब्रेक दाबला. पण यामध्ये कोणताही अपघात झाला नाही. दरम्यान, कामात अक्षम्य चूक केल्यामुळे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
रविवारी दुपारी साधारण २.३० च्या सुमारास दिवा स्थानकातील फलाट क्र. १ व २ च्या मधील सरकत्या जिन्यांच्या कामासाठी ही उपकरणे घेऊन कामगार निघाले होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कामगार कंत्राटदार तसेच विद्युत विभागातील पर्यवेक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय काम करत होते. पदपूलाचा वापर करण्याऐवजी त्यांनी रेल्वे रूळ ओलांडण्याला प्राधान्य दिले. मोटरमनने अचानक ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दोन डबे त्या उपकरणांवरून गेले होते. हे सर्व सामान तिथून काढून घेईपर्यंत लोकलचा खोळंबा झाला.
रेल्वेच्या कायद्यांनुसार कलम १५३ , कलम १७४ व कलम १४७ या अंतर्गत या पर्यवेक्षक व तीन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर करून नंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे काम मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू होते. या प्रकरणी तपास सुरू असून, उप-कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भलोदे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -