अंधेरीत १० लाख रुपयांच्या एमडीसह तरुणाला अटक

एमडी ड्रग्जसह तरूणाला अंधेरीतील डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai
crime
प्रातिनिधीक फोटो

अंधेरी येथे सुमारे १० लाख रुपयांच्या एमडीसह एका तरुणाला काल बुधवारी डी. एन. नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. फैजुउद्दीन ऊर्फ रेहान मोहम्मद नासीरउद्दीन काझी असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी १० लाख रुपयांचे २५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, ३६० रुपयांची रोकड जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये विद्यापीठ उपकेंद्राच्या कार्यक्रमात गोंधळ

अंधेरीतील गिल्बर्ट हिल रोड, एकता सोसायटीजवळ काही तरुण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या पथकातील सचिन कांबळे, शेखर भालेराव, विकास पाटील, राहुल लाड, नितीन शिरसाठ, शरद पाटील, मनोज मोरे, परब यांनी एकता सोसायटीजवळील युसूफ मेहर अली मैदानासमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे फैजुउद्दीन काझी हा तरुण आला. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि ३६० रुपयांची रोकड सापडली. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केली.

सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

अटक केलेला फैजुउद्दीन अंधेरीतील जे. पी. रोडवर, टेप दर्गाजवळील अपना बाजार, सुहाना चाळ या ठिकाणी राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो ड्रग्जची खरेदी-विक्री करीत होता. त्याने यापूर्वीही एमडी ड्रग्जची विक्री केल्याचे बोलले जाते. त्याने ते ड्रग्ज कोणाकडून आणि कोणत्या प्रकारे प्राप्त केले? त्याचे इतर काही सहकारी आहेत का? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.